मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बॅटरी हिल परिसरात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. ट्रकच्या ब्रेक फेलमुळे पाच वाहनांची धडक झाली, ज्यात बाप-लेकीचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाले.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बॅटरी हिल परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने पाच वाहनांना धडक दिली गेली असून, या दुर्घटनेत बाप आणि त्याच्या अल्पवयीन लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. १२ जण जखमी असून त्यांच्यावर लोणावळ्यातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
हा अपघात रविवारी रात्री सुमारे १०.३० च्या सुमारास घडला. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने मागून एक इनोव्हा कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर अलिबागहून पुण्याकडे निघालेली एर्टिगा कार, टाटा पंच आणि एक ऑटो रिक्षा देखील या अपघातात सापडले.
एर्टिगा कारमधील प्रवाशांमध्ये बाप-लेकीचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. अपघात इतका भीषण होता की काही वाहनांचे अक्षरशः चक्काचूर झाले. जखमी प्रवाशांना तात्काळ लोणावळा येथील श्री हॉस्पिटल आणि संजिवनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातानंतर आयआरबीचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकांच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल केले. अपघातातील मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नसून, लोणावळा पोलीस अधिक तपास करत आहेत. या अपघातामुळे खंडाळा घाट परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.


