गोरेगावात 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली ज्येष्ठ व्यक्तीची ७१ लाखांची फसवणूक

| Published : Dec 07 2024, 12:03 PM IST / Updated: Dec 07 2024, 12:14 PM IST

 cyber Crime

सार

मुंबईत एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीची ७१.२४ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर गुन्हेगारांनी दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून त्यांना 'डिजिटल अरेस्ट' केले आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचा खोटा आरोप लावला.

मुंबई: 'डिजिटल अरेस्ट' करून सायबर गुन्हेगारांनी मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील एका खासगी कंपनीतील ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीची ७१.२४ लाखांची फसवणुक केली आहे. सायबर गुन्हेगारांनी दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवुन पीडित व्यक्तीला ८ तास डिजिटल पद्धतीने ताब्यात घेतले. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचा खोटा आरोप लावला आणि त्यांच्या दोन बँक खात्यांमधून ७१.२४ लाख हस्तांतरित करून फसवणूक केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या नॉर्थ रिजन सायबर स्टेशनमध्ये दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय पार्सल जप्त केल्याचे सांगितले

उत्तर सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ सप्टेंबर २०२४ रोजी घडली. पीडित व्यक्तीला कस्टम अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. कॉलरने त्यांना सांगितले की त्यांच्या नावे असलेले एक आंतरराष्ट्रीय पार्सल जप्त करण्यात आले असून त्यात १६ पासपोर्ट, ५८ एटीएम कार्ड आणि १८० ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज आहेत. त्यानंतर कॉलरने त्यांना व्हिडीओ कॉलद्वारे सुनील कुमार नावाच्या दिल्ली क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीशी जोडले.

डिजिटल अरेस्ट केले

तोतया अधिकाऱ्याने पीडित व्यक्तीला त्याच्या खोट्या पोलीस आयडीची आणि अटक वॉरंटची एक प्रत पाठवली आणि त्यांना 'डिजिटली अरेस्ट' केल्याचे सांगितले. त्याने पीडित व्यक्तिला व्हिडिओ कॉल चालु ठेवण्यास सांगून या दरम्यान कोणाशीही संपर्क न करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तोतया अधिकाऱ्याने पीडित व्यक्तीच्या बँक खात्याच्या तपशीलाची मागणी केली आणि त्याने माहिती न दिल्यास पुढील कारवाई करण्याची धमकी दिली. खात्याची माहिती मिळाल्यानंतर, तपासानंतर पैसे परत केले जातील असे आश्वासन देऊन गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यातून ७१.२४ लाख हस्तांतरित केले.

मात्र पैसे परत न मिळाल्याने वृद्ध व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी पोलिसात गुन्हा नोंदवला. आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आणखी वाचा-

मुंबईत महिलेची 'डिजिटल अरेस्ट', १.७ लाखांची झाली फसवणूक

७७ वर्षीय महिलेची ३.८ कोटींची फसवणूक