एलएनजेपी (LNJP) रुग्णालयाच्या न्यूरो ॲनेस्थेशिया विभागातील कन्सल्टंट फिजिशियन डॉ. भुवना आहुजा सांगतात की, सतत मोबाईलमध्ये बघण्याच्या सवयीमुळे मानेच्या स्नायूंवर ताण येतो. यामुळे मणक्याचा नैसर्गिक आकार बिघडतो आणि नसांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
मुंबई : १६ ऑक्टोबरला 'जागतिक मणका दिन' (World Spine Day) पाळला जातो. आजच्या डिजिटल युगात आपल्या मणक्याची काळजी घेणं खूप गरजेचं झालं आहे. आपण तासनतास मोबाईलच्या स्क्रीनकडे मान खाली घालून बघत असतो. पण तुम्हाला माहितीये का? यामुळे आपल्या मानेवर रोज तब्बल २२ किलो वजनाचा दाब पडतो.
या आजाराला 'टेक्स्ट नेक सिंड्रोम' (Text Neck Syndrome) म्हणतात. एलएनजेपी (LNJP) रुग्णालयाच्या न्यूरो ॲनेस्थेशिया विभागातील कन्सल्टंट फिजिशियन डॉ. भुवना आहुजा सांगतात की, या सवयीमुळे स्नायूंवर भयंकर ताण येतो, मणक्याचा नैसर्गिक आकार सपाट होतो आणि नसांचे दीर्घकालीन नुकसान होते.
मोबाईल बघताना आपण जेव्हा मान पुढे झुकवतो, तेव्हा मानेवरचा ताण अनेक पटींनी वाढतो. मान पुढे झुकवल्यावर मानेच्या मणक्याला २२ किलोपर्यंत वजन सहन करावं लागतं. हे म्हणजे रोज तासनतास एखाद्या लहान मुलाला मानेवर बसवून फिरवण्यासारखं आहे.
माणसाच्या डोक्याचं सरासरी वजन ४.५ ते ५ किलो असतं. जेव्हा आपण सरळ उभे असतो, तेव्हा शरीर हे वजन सहज पेलतं. पण सतत खाली बघितल्यामुळे मणक्याचा नैसर्गिक 'C' आकाराचा वक्र सरळ व्हायला लागतो. याला वैद्यकीय भाषेत 'हायपोलॉर्डोसिस' (Hypolordosis) किंवा सर्व्हायकल स्पाईन स्ट्रेटनिंग म्हणतात. यामुळे मानेत भयंकर ताण येतो, मान जखडते आणि लवकर थकवा येतो.
मानेवर जास्त दाब पडल्यामुळे C1 ते C7 मणक्यांमधील चकत्या (Discs) दबल्या जातात. यामुळे आतला भाग बाहेर येतो आणि सूज किंवा हर्निएशनचा (Herniation) त्रास सुरू होतो. कालांतराने तिथे रक्तप्रवाह कमी होतो, लॅक्टिक ॲसिड साठतं आणि स्नायूंमध्ये वेदनादायी गाठी तयार होतात. खांदे पुढे झुकतात आणि क्रॉनिक सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा (Cervical Spondylosis) धोका वाढतो.
तासनतास मोबाईल आणि लॅपटॉपवर काम करताना मान आणि खांद्यामध्ये दुखणं ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. आजकाल हे खूप सामान्य झालं आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे आणि मान पुढे काढून काम करण्याच्या सवयीमुळे मानेच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण पडतो.
'टेक्स्ट नेक सिंड्रोम'ची सुरुवात हलक्या मानदुखीने होते. पण हळूहळू हा त्रास वाढत जातो. खांदे, हात आणि बोटांमध्ये मुंग्या येतात किंवा बधीरपणा जाणवतो. डोक्याच्या मागच्या नसा (Occipital nerves) दबल्या गेल्यामुळे तिथे भयंकर डोकेदुखी सुरू होते. यासोबतच चक्कर येणे, मळमळणे, मानेच्या सांध्यांमध्ये (Facet joints) सूज येणे आणि मान हलवायला त्रास होणे अशी लक्षणेही दिसतात.
या सगळ्यामुळे 'टेक नेक' (Tech Neck) नावाची स्थिती निर्माण होते. अलीकडच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या बहुतांश लोकांना मानेच्या तीव्र वेदनांचा सामना करावा लागतोय. चुकीच्या पद्धतीने बसणे आणि सतत मोबाईलकडे बघणे यामुळे हा त्रास आणखी वाढतो.
मानेवरचा ताण टाळायचा असेल, तर मोबाईल नेहमी डोळ्यांच्या रेषेत (Eye level) सरळ पकडा. कॉम्प्युटर स्क्रीनवर काम करताना सुरक्षित अंतर ठेवा. खुर्चीत बसताना नेहमी पाठ आणि मान सरळ ठेवा.







