आजकाल ३० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढले आहे. खराब जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीचा आहार ही यामागची मुख्य कारणं आहेत. वयाची २५ वर्षे ओलांडल्यानंतर नियमित तपासणी आणि योग्य सवयी लावून घेतल्यास आपण आपल्या हृदयाची काळजी नक्कीच घेऊ शकतो.
मुंबई : "मी अजून ४० वर्षांचा पण नाहीये, मग मी आतापासूनच हृदयाची काळजी का करू?" असा विचार अनेकजण करतात. पण हार्ट अटॅक फक्त म्हाताऱ्या लोकांनाच येतो, हा समज आता जुना झालाय. आजकाल ३०-४० वर्षांच्या तरुणांना हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या आपण रोजच ऐकतो. हे सगळं पाहिल्यावर "मलाही असा काही त्रास होईल का?" अशी भीती वाटणं अगदी साहजिक आहे.
तरुणांमध्ये वाढणाऱ्या या समस्येमागे कोणतंही एकच कारण नाही. वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर यामागे अनेक कारणं आहेत. इतिहासात डोकावून पाहिलं तर, गेल्या ३ लाख वर्षांपासून मानवी शरीर हे जंगलात शिकार करणं, अन्नाची कमतरता आणि प्रचंड शारीरिक कष्ट या गोष्टींना सरावलेलं होतं. पण गेल्या काही दशकांमध्ये आपली जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे.
- शारीरिक हालचालींचा अभाव: दिवसभर एकाच जागी बसून काम करणं आणि व्यायामाचा पूर्णपणे अभाव.
- चुकीचा आहार: जास्त तेलात तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरेचं जास्त प्रमाण आणि जेवणाच्या चुकीच्या वेळा. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठायला लागते.
- धूम्रपान आणि मद्यपान: या व्यसनांमुळे हृदय आणि रक्तवाहिन्या हळूहळू कमकुवत होतात.
- ताणतणाव आणि अपुरी झोप: रात्री उशिरापर्यंत काम करणं, उशिरा झोपणं, सततची चिंता आणि कामाचा ताण यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात.
- अनुवांशिकता: जर तुमच्या आई-वडिलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना हृदयाचा त्रास असेल, तर तुम्हालाही हा त्रास होण्याची शक्यता थोडी जास्त असते.
या सगळ्या कारणांमुळे अगदी तरुण वयातच ब्लड प्रेशर, मधुमेह (शुगर), कोलेस्ट्रॉल आणि हार्मोन्समधील बदल यांसारख्या समस्या सुरू होतात. पुढे जाऊन याच गोष्टी हृदयरोगाला आमंत्रण देतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या आजारांची सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. दुसऱ्याच एखाद्या आजारासाठी जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, तेव्हा कुठे या समस्या असल्याचं उघडकीस येतं.
तुम्ही काय करायला हवं?
वयाची २५ वर्षे ओलांडल्यानंतर, तुम्हाला कोणताही त्रास नसला तरीही वर्षातून एकदा बीपी, शुगर आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी नक्की करून घ्या. हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप मोठे बदल करण्याची गरज नाही, छोट्या-छोट्या सवयी बदलूनही तुम्ही हृदयाची काळजी घेऊ शकता. त्या सवयी खालीलप्रमाणे आहेत:
- रोज किमान अर्धा तास चाला किंवा आठवड्यातून १५० ते ३०० मिनिटे व्यायाम करा. दिवसभर शक्य तितकं सक्रिय राहा.
- आहारात फळे, पालेभाज्या, कडधान्ये यांचा जास्तीत जास्त समावेश करा. साखर, तेलकट पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न आणि मीठ यांचं प्रमाण मर्यादित ठेवा.
- जर तुम्ही धूम्रपान किंवा मद्यपान करत असाल, तर ते हळूहळू कमी करून पूर्णपणे बंद करा.
- हृदयाच्या आरोग्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे.
- मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी प्राणायाम आणि ध्यानधारणा करा, याचा हृदयाला खूप फायदा होतो.
थोडं चालल्यावरही धाप लागणं किंवा खूप थकवा येणं, विनाकारण घाम येणं, छातीत दुखणं किंवा जड वाटणं, मान, जबडा आणि डाव्या हाताकडे वेदना पसरणं, छातीत जळजळ होणं – यापैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास अजिबात वेळ न घालवता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हृदयाची काळजी घेणं हा वयाची ४० वर्षे ओलांडल्यानंतर विचार करण्याचा विषय नाही, तर ती आजपासूनच सुरू करायची एक गुंतवणूक आहे. हार्ट अटॅकची भीती बाळगण्यापेक्षा, जीवनशैलीत हे छोटे बदल करा आणि हृदयरोगाला दूर ठेवा.
लेखक: डॉ. आदर्श कळीमठ, सहाय्यक प्राध्यापक, कायचिकित्सा विभाग, एसडीएम आयुर्वेद कॉलेज आणि हॉस्पिटल, हसन.


