शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. पण तज्ज्ञांच्या मते, शेंगदाण्यातील नैसर्गिक तेल आणि कोरडेपणामुळे लगेच पाणी प्यायल्यास घशात खवखव किंवा खोकला येऊ शकतो.
मुंबई : अनेकांना टाइमपास म्हणून शेंगदाणे खायला आवडतं. पण शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये, असा सल्ला दिला जातो. शेंगदाणे कोरडे असल्यामुळे ते खाल्ल्यावर आपल्याला साहजिकच तहान लागते. पण शेंगदाणे शरीरात उष्णता निर्माण करतात. त्यावर लगेच थंड पाणी प्यायल्यास घसा दुखणे, सर्दी किंवा खोकला होऊ शकतो, असे अभ्यासातून समोर आले आहे.
आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, शेंगदाण्यांमध्ये नैसर्गिक तेल आणि बारीक कण असतात. यामुळे घशात खवखव, खाज किंवा अचानक खोकला येऊ शकतो.
शेंगदाणे शरीरात उष्णता वाढवतात. शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्यास शरीराचे तापमान बिघडते. ही अचानक होणारी थंड-गरम प्रक्रिया सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या समस्या निर्माण करते.
लहान मुलांनी शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी पिणे टाळावे. यामुळे त्यांच्यात ॲलर्जीचा धोका वाढतो. काही लहान मुले आणि मोठ्यांना शेंगदाण्याची ॲलर्जी असते. त्यांनी शेंगदाणे खाऊन लगेच पाणी प्यायल्यास घशात जास्त खवखव आणि अस्वस्थता जाणवते. त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी पिणे टाळावे.
ज्यांना शेंगदाणे खाल्ल्यावर घशाचा त्रास होतो, त्यांनी किमान १० ते १५ मिनिटे थांबून पाणी प्यावे. तसेच, थंड पाण्याऐवजी नेहमीच्या तापमानाचे (रुम टेम्परेचर) पाणी प्यावे.

