दह्यामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी ५ भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन बी ५ मुळे डोक्याच्या त्वचेतील रक्तप्रवाह सुधारतो. तसंच दह्यातील प्रोबायोटिक्स पोटाचं आरोग्यही चांगलं ठेवतात, ज्याचा फायदा केसांना होतो.

मुंबई : केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळण्यासाठी आहारात प्रोटीन, लोह (iron), जीवनसत्त्वे आणि निरोगी फॅट्स असणं खूप गरजेचं आहे. रोजच्या जेवणातून हे घटक मिळाले की केसांची चांगली वाढ होते. पण या पोषक घटकांची कमतरता असेल, तर केस पातळ होणे, तुटणे किंवा त्यांची वाढ खुंटणे अशा समस्या सुरू होतात. केसगळती कमी करण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर ठरतात, ते आपण पाहूया.

अंडी

अंड्यामध्ये प्रोटीन, बायोटिन, झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन डी असतं. अंड्याच्या पांढऱ्या भागात केराटिन (keratin) निर्मितीसाठी आवश्यक असलेलं संपूर्ण प्रोटीन मिळतं. नाश्त्यामध्ये दोन उकडलेली अंडी खाल्ल्यास केसगळती नक्कीच कमी होऊ शकते.

कढीपत्ता

कढीपत्त्यात लोह (iron), अँटीऑक्सिडंट्स आणि बीटा-कॅरोटीन असतं. यामुळे केस निरोगी राहतात आणि केसगळती कमी व्हायला मदत होते.

मेथीचे दाणे

मेथीच्या दाण्यांमध्ये फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं. केसगळती रोखण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो.

आवळा

आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, टॅनिन आणि आवश्यक फॅटी ॲसिड्सनी समृद्ध असलेला आवळा डोक्याच्या त्वचेचं आरोग्य सुधारतो आणि केसांना मजबूती देतो.

मासे

सॅल्मनसारख्या फॅटी माशांमध्ये प्रोटीन, फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन ए भरपूर असतं. यातील निरोगी फॅटी ॲसिड्समुळे केसांची घनता वाढते आणि डोक्यावर केस दाट उगवण्यास मदत होते.

शेंगदाणे

शेंगदाण्यांमध्ये बायोटिन, प्लांट-बेस्ड प्रोटीन आणि व्हिटॅमिन ई असतं. रोज मूठभर शेंगदाणे आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा.

दही

दह्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी ५ आणि प्रोबायोटिक्स असतात. व्हिटॅमिन बी ५ मुळे डोक्याच्या त्वचेकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारतो. तर दह्यातील प्रोबायोटिक्स पोटाचं आरोग्य चांगलं ठेवतात.