अपुरी झोप आणि नैराश्य, चिंता यांचा थेट संबंध असल्याचं संशोधनातून समोर आलंय. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्याने फक्त डोळ्यांनाच त्रास होत नाही, तर इतरही गंभीर आजार मागे लागतात.
मुंबई : रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहण्याची सवय तुमच्या डोळ्यांसाठी खूपच घातक ठरत आहे. फोनमधून निघणारा निळा प्रकाश (Blue Light) शरीरातील मेलाटोनिनची निर्मिती रोखतो आणि त्यामुळे झोप उडते. पण, याचे दुष्परिणाम फक्त झोप न येण्यापुरते मर्यादित नाहीत.
पूर्ण अंधार असलेल्या खोलीत जेव्हा तुम्ही फोन 'डार्क मोड'वर (Dark Mode) वापरता, तेव्हा जास्तीत जास्त प्रकाश आत घेण्यासाठी डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारतात. अशा अंधाऱ्या पार्श्वभूमीवर जेव्हा अचानक चमकदार अक्षरे किंवा चित्रे दिसतात, तेव्हा उजेड असलेल्या खोलीपेक्षा डोळ्यांवर जास्त ताण पडतो. या 'कॉन्ट्रास्ट'मुळे (contrast) डोळ्यांना मोठा धक्का बसतो. त्यातच, फोन वापरताना मान खाली घालून बसण्याची सवय असल्यामुळे डोळे थकण्याआधीच त्यांच्यावर प्रचंड ताण आलेला असतो, असं तज्ज्ञ सांगतात.
अंथरुणात पडून मोबाईल स्क्रोल केल्याने मेंदूला 'अजूनही दिवसच आहे' असा चुकीचा संदेश जातो. यामुळे मेलाटोनिन उशिरा तयार होतं आणि आपलं संपूर्ण स्लीप सायकल (झोपेचं चक्र) बिघडून जातं. अपुरी झोप ही नैराश्य आणि चिंतेशी जोडलेली असल्याचं संशोधनातून सिद्ध झालंय. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहिल्याने होणारा डोळ्यांचा त्रास कधीच एकटा येत नाही, तो सोबत इतरही समस्या आणतो.
रात्री सलग काही तास फोन पाहिल्यानंतर जर तुमचे डोळे जड वाटत असतील किंवा रखरखीत वाटत असतील, तर तो फक्त थकवा नसतो. तुमच्या डोळ्यांच्या पृष्ठभागावर खरोखरच काहीतरी शारीरिक बदल होत असतो. रात्री ९ च्या सुमारास पापण्यांच्या आजूबाजूला किंवा डोळ्यांच्या मागे जी मंद वेदना जाणवते, ती अनेकदा कामाच्या ताणामुळे असल्याचा आपला गैरसमज असतो. पण, यामागे 'कन्व्हर्जन्स फटीग' (convergence fatigue) हे मुख्य कारण असतं.
रात्रीच्या वेळी आपलं शरीर नैसर्गिकरित्या झोपेसाठी तयार होतं. यात 'मेलाटोनिन' या हार्मोनची भूमिका खूप महत्त्वाची असते. अंधार वाढला की मेलाटोनिनची पातळी वाढते आणि शरीराला झोपण्याची वेळ झाल्याचा सिग्नल मिळतो. पण, फोनसारख्या एलईडी स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश या प्रक्रियेत अडथळा आणतो आणि शरीराच्या 'सर्केडियन क्लॉक'वर (circadian clock) वाईट परिणाम करतो.


