रस्त्यांवर शितपेय विकले तर कधी वृत्तपत्र वाटले, आता आहेत 97 लाख कोटींचे मालक!
Warren Buffett Life Story From Childhood : सर्वात मोठे गुंतवणूकदार आणि 97 लाख कोटींचे मालक असलेल्या वॉरेन बफे यांच्या मुलीला, तिचे वडील इतके श्रीमंत आहेत हे 22 वर्षांपर्यंत माहीतच नव्हतं. ही रंजक कहाणी वॉरेन बफे यांची आहे. वाचा त्यांची सक्सेस स्टोरी.

वॉरेन बफेंची 60 वर्षांची कारकीर्द
वॉरेन बफे यांनी आपल्या 60 वर्षांच्या कारकिर्दीत एक अयशस्वी कापड कंपनी बर्कशायर हॅथवेला 1.08 ट्रिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 97 लाख कोटी रुपयांच्या साम्राज्यात बदलले. त्यांचे यश पूर्णपणे त्यांची मेहनत, संयम आणि 'व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग'च्या सिद्धांताचा परिणाम होता. वॉरेन यांना लहानपणापासूनच पैसे कमावण्याची आवड होती. त्यांना छोट्या-मोठ्या व्यवसायात मजा यायची. ते कधी रस्त्यांवर कोल्ड्रिंक विकून, कधी वृत्तपत्र वाटून, तर कधी पॉपकॉर्न आणि पिनबॉल मशीन लावून पैसे कमवायचे.
वॉरेन बफे: वयाच्या 11 व्या वर्षी पहिला मोठा धडा
बफे यांनी वयाच्या 11 व्या वर्षी 38 डॉलरमध्ये शेअर खरेदी केले. बाजार घसरताच त्यांनी ते 40 डॉलरमध्ये विकले, जे नंतर 202 डॉलरपर्यंत पोहोचले. सुरुवातीला हे नुकसान वाटू शकते, पण या अनुभवाने त्यांना तीन मोठे धडे दिले. गुंतवणुकीत घाई करू नका, दुसऱ्यांचे पैसे स्पष्टतेशिवाय गुंतवू नका आणि संयम ठेवा.
वॉरेन बफेंचे गुरु कोण?
वयाच्या 19 व्या वर्षी बफे यांनी 'द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर' हे पुस्तक वाचले आणि बेंजामिन ग्रॅहम यांना आपले गुरू बनवले. ग्रॅहम यांनी त्यांना शिकवले की शेअरला फक्त कागद न मानता, व्यवसाय समजा. बाजारातील चढ-उतारांचा फायदा घ्या. नेहमी सुरक्षेचे मार्जिन ठेवा.
बर्कशायर हॅथवे: एक चूक आणि यश
1965 मध्ये बफे यांनी बर्कशायर हॅथवे ही संपूर्ण कंपनी विकत घेतली. सुरुवातीला ही एक चूक ठरली, पण त्यांनी तिचे रूपांतर एका गुंतवणूक फर्ममध्ये केले. विमा कंपन्यांची खरेदी त्यांच्यासाठी गुंतवणुकीकरिता विनाशुल्क पैसा देणारे शस्त्र ठरले. आता कंपनीचा एक शेअर सुमारे 6.3 कोटी रुपयांना विकला जातो.
वडिलांविषयी मुलीला वृत्तपत्रातून कळलं
वॉरेन बफे यांची मुलगी सुसान हिला वयाच्या 22 वर्षांपर्यंत हे माहीतच नव्हते की तिचे वडील इतके श्रीमंत आहेत. सुसानच्या मते, तिला तिच्या वडिलांच्या प्रचंड संपत्तीबद्दल 'वॉल स्ट्रीट जर्नल'मधील एका लेखातून समजले.
वॉरेन बफेंबद्दल ५ रंजक गोष्टी
- 1958 मध्ये खरेदी केलेल्या जुन्या घरातच ते आजही राहतात. त्यांनी ओमाहा शहर कधीच सोडले नाही.
- ते गाड्या कमी बदलतात, अगदी फ्लिप फोनसुद्धा वापरला आहे. सध्या ते कॅडिलॅक चालवतात. वर्षाला सुमारे 5,632 किमी गाडी चालवतात.
- साध्या सवयी आजही जपल्या आहेत. हाँगकाँगच्या मॅकडोनाल्डमध्ये कूपन वापरून पैसे दिले. ते कोकचे शौकीन आहेत. अनेक वर्षे मॅकडोनाल्डमध्ये 3 डॉलरपेक्षा कमी किमतीचा नाश्ता करत होते.
- पत्ते खेळणे, गोल्फ आणि गिटार वाजवण्याचा छंद आहे. वयाच्या 95 व्या वर्षीही 80% वेळ वाचनात घालवतात. ते म्हणतात, 'जितके जास्त शिकाल, तितके जास्त कमवाल.'
- त्यांनी 2 लग्न केली असून, त्यांना तीन मुले आहेत. पहिली मुलगी सुसानच्या जन्मानंतर ड्रॉवरलाच पाळणा बनवले होते. दुसऱ्या मुलासाठी पाळणा उधार घेतला होता.

