Vijayadashami 2025 : विजयादशमी किंवा दसरा हा सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर विजय दर्शवणारा सण आहे. रामायणानुसार या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला. तर जाणून घ्या विजयादशमी सणाबद्दल सविस्तर वाचा.

Vijayadashami 2025 : विजयादशमी हा भारतातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. तो दशमी तिथीला साजरा केला जातो, म्हणून त्याला "दसरा" असेही म्हटले जाते. पौराणिक कथांनुसार, या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा पराभव करून धर्माच्या विजयाची स्थापना केली. रामायणातील या प्रसंगाला "सत्याचा असत्यावर विजय" असे प्रतीक मानले जाते. त्यामुळे विजयादशमीचा दिवस शक्ती, धैर्य आणि न्यायाचा संदेश देणारा आहे.

महिषासुरमर्दिनीची कथा

विजयादशमीचे आणखी एक पौराणिक कारण म्हणजे महालक्ष्मीचे अवतार असलेल्या देवी दुर्गेने महिषासुर या राक्षसाचा वध केला. महिषासुराला देव-दानव युद्धात अजिंक्यत्व मिळाल्याने त्याने देवांवर अत्याचार सुरू केले. त्याचा नाश करण्यासाठी देवी दुर्गा प्रकट झाली आणि अखेर नऊ दिवसांच्या संग्रामानंतर दशमीला महिषासुराचा वध करून धर्माचे रक्षण केले. त्यामुळे विजयादशमी हा देवी विजयाचा दिवस मानला जातो.

धार्मिक आणि सामाजिक महत्व

विजयादशमी हा दुर्जनांवर सज्जनांचा, अन्यायावर न्यायाचा विजय दर्शवतो. या दिवशी अनेक ठिकाणी रावण दहन केले जाते, तर काही ठिकाणी देवीची विसर्जन मिरवणूक काढली जाते. महाराष्ट्रात या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना सोन्याचे प्रतीक म्हणून दिली जातात, ज्यातून समृद्धी आणि सौहार्द टिकवण्याचा संदेश मिळतो. याच दिवशी शस्त्रपूजा आणि व्यापार-व्यवसायात नवीन कामाची सुरुवात करण्याची परंपरा आहे.

विजयादशमीचे सांस्कृतिक स्वरूप

देशभरात विजयादशमी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. उत्तर भारतात रामलीला आणि रावण दहनाची परंपरा आहे, तर बंगालमध्ये दुर्गापूजेनंतरच्या विजयोत्सवात सिंदूर खेला होते. महाराष्ट्र, कर्नाटक व दक्षिण भारतात शस्त्रपूजा आणि वाहनपूजा केली जाते. हा सण एकतेचा आणि परंपरेचा संगम मानला जातो.

विजयादशमी २०२५ मधील तारीख

विजयादशमी २०२५ मध्ये २ ऑक्टोबर (गुरुवार) रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सकाळी पूजा-अर्चा, शस्त्रपूजा, देवीचे विसर्जन आणि संध्याकाळी रावण दहनाचे आयोजन केले जाईल. धार्मिक विधी आणि सणासुदीचे वातावरणामुळे या दिवसाचे महत्व अधिक अधोरेखित होते.