दही आणि इतर आंबवलेल्या पदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स भरपूर असतात. हे प्रोबायोटिक्स आपल्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियासाठी फायदेशीर ठरतात आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
मुंबई : तुम्हाला तुमची तब्येत सुधारायची आहे का? मग रोजच्या जेवणात आंबवलेल्या पदार्थांचा (Fermented Foods) समावेश करणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. दह्यासारख्या पदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स (Probiotics) भरपूर प्रमाणात असतात. हे आपल्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाला वाढवतात आणि पचनक्रिया सोपी करतात. पण याचा खरा फायदा हवा असेल, तर सलग दोन आठवडे तरी हे पदार्थ तुमच्या आहारात असायला हवेत. यामुळे शरीराला अन्नातून पोषक तत्वं शोषून घ्यायला मदत होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनाच्या तक्रारी दूर होतात. आंबवलेल्या पदार्थांचे मुख्य फायदे जाणून घेऊया.
आतड्यांचं आरोग्य सुधारतं
आंबवलेले पदार्थ आपल्या शरीराला थेट चांगले बॅक्टेरिया पुरवतात. दही, ताक आणि केफिर (Kefir) यांसारख्या पदार्थांमधील सक्रिय बॅक्टेरिया आतड्यातील हानिकारक जीवाणू नष्ट करतात आणि आतड्यांचं आरोग्य जपतात.
रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते
आपल्या शरीराची जवळपास ७० टक्के रोगप्रतिकारशक्ती आतड्यांच्या कार्यावर अवलंबून असते. आंबवलेल्या पदार्थांमधील चांगले सूक्ष्मजंतू आतड्यांमधील पेशींसोबत काम करून अँटीबॉडी (Antibody) निर्मिती वाढवतात. यामुळे आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते.
मेटाबॉलिझम वाढतो
शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि मेटाबॉलिक आरोग्य सुधारण्यासाठी आंबवलेले पदार्थ मदत करतात. नियमितपणे हे पदार्थ खाल्ल्यास वजन कमी होण्यास, पोटावरची चरबी घटण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
सुरुवात कशी करावी?
आंबवलेले पदार्थ खायला सुरुवात करताना एकदम जास्त खाऊ नका. सुरुवातीला रोज एक छोटा चमचा किंवा अर्धी वाटी दही खाऊन सुरुवात करा. हळूहळू तुमच्या आतड्यांना याची सवय झाल्यावर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. सलग दोन आठवडे ही सवय जपल्यास तुमच्या पचनक्रियेत आणि उत्साहात मोठा फरक जाणवेल.


