Shaking Legs : बसल्या जागी पाय हलवल्याने खरंच दारिद्र्य येतं का? काय सांगतं विज्ञान?
अनेकांना बसल्या जागी पाय हलवायची सवय असते. पण सतत पाय हलवल्याने खरंच दारिद्र्य येतं का? हे आरोग्यासाठी वाईट असतं का? घरातील मोठी माणसं जे सांगतात त्यात किती तथ्य आहे आणि डॉक्टर याबद्दल काय म्हणतात?

दारिद्र्य येतं किंवा आरोग्य बिघडतं?
खुर्चीवर बसल्यावर किंवा शांतपणे बोलत असताना अनेकांना नकळत पाय हलवायची सवय असते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांमध्ये ही सवय दिसते. 'असे रिकामटेकड्यासारखे पाय हलवू नये, यामुळे दारिद्र्य येतं किंवा आरोग्य बिघडतं', असं घरातील मोठी माणसं अनेकदा सांगतात. पण या बोलण्यात किती तथ्य आहे? यामागे कोणती वैज्ञानिक आणि वैद्यकीय कारणं आहेत, हे डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

११ निरोगी लोकांवर एक अभ्यास करण्यात आला
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, बसल्या जागी सतत पाय हलवणं ही केवळ एक सामान्य सवय नाही. हे आपल्या शरीरात होणाऱ्या काही शारीरिक किंवा मानसिक बदलांचे संकेत असू शकतात. संशोधनानुसार, पाय हलवल्याने रक्तप्रवाहात बदल होऊ शकतात. एका जागी जास्त वेळ न हलता बसल्यास पायांमधील रक्तप्रवाह कमी होतो. अशा वेळी पावलं हलवल्याने किंवा टाचा वर-खाली केल्याने रक्तप्रवाह तात्पुरता वाढू शकतो. २०१६ मध्ये ११ निरोगी लोकांवर एक अभ्यास करण्यात आला. तीन तास बसून असताना त्यांनी मध्येच एक पाय हलवला, तेव्हा त्या पायातील रक्तप्रवाहाचे निर्देशक चांगले असल्याचे संशोधकांना आढळले. पण हा एक छोटा अभ्यास होता, यावरून सर्व आजार टळतील असं म्हणता येणार नाही.
पाय हलवणं म्हणजे दारिद्र्य नाही
पाय हलवताना स्नायू काही प्रमाणात ऊर्जेचा वापर करतात. त्यामुळे शांत बसण्यापेक्षा थोडी जास्त ऊर्जा खर्च होते. पण वजन कमी करण्यासाठी फक्त पाय हलवणं पुरेसं नाही. त्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम गरजेचा आहे. तासन् तास एकाच जागी बसून राहणं आरोग्यासाठी चांगलं नाही. मध्येच उठून उभं राहणं, थोडं चालणं आणि स्ट्रेचिंग करणं फायद्याचं ठरतं. पण जर पाय न हलवता अस्वस्थ वाटत असेल आणि विशेषतः रात्री पायांचा त्रास वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हे 'रेस्टलेस लेग्स सिंड्रोम' (Restless Legs Syndrome) चे लक्षण असू शकते. थोडक्यात सांगायचं तर, पाय हलवणं म्हणजे दारिद्र्य नाही. रक्तप्रवाह सुधारण्यासाठी याचा थोडा फायदा होतो, पण हा व्यायामाला पर्याय नाही.







