- Home
- lifestyle
- Petrichor : पावसानंतर येणाऱ्या मातीच्या सुगंधाला एक खास नाव आहे, तुम्हाला माहितीये का?
Petrichor : पावसानंतर येणाऱ्या मातीच्या सुगंधाला एक खास नाव आहे, तुम्हाला माहितीये का?
पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारा मातीचा सुगंध आपल्यापैकी अनेकांना आवडतो. काहींना तर ही माती खाण्याचीही सवय असते. पाऊस पडण्याआधीच हा सुगंध आपल्याला पावसाची चाहूल देतो. पण या मातीच्या सुगंधाला एक खास नाव आहे, माहितेय का?

हा सुगंध नेमका कुठून येतो?
पावसाळ्यापूर्वी कडक ऊन असते, तेव्हा माती आणि खडकांवर वनस्पतींची काही तेले आणि सेंद्रिय पदार्थ जमा होतात. त्याच वेळी, मातीतील काही सूक्ष्मजीव 'जिओस्मिन' (Geosmin) नावाचा एक विशिष्ट सुगंध सोडतात. ओल्या मातीतून येणाऱ्या या सुगंधात जिओस्मिनची भूमिका खूप महत्त्वाची असते.

पावसाचे थेंब पडताच हा सुगंध हवेत कसा पसरतो?
पावसाचा थेंब जेव्हा कोरड्या मातीवर पडतो, तेव्हा छोटे हवेचे बुडबुडे तयार होतात आणि फुटतात. या प्रक्रियेत मातीतील सेंद्रिय पदार्थ, सूक्ष्मजीवांमधून बाहेर पडणारे घटक आणि जिओस्मिनसारखी संयुगे सूक्ष्म कणांद्वारे हवेत मिसळतात. म्हणूनच पाऊस सुरू होताच काही वेळातच आपल्याला मातीचा सुगंध येऊ लागतो.
पहिल्या पावसात हा सुगंध जास्त का येतो?
खूप दिवस पाऊस न पडल्याने माती कोरडी असते, तेव्हा सुगंध निर्माण करणारे पदार्थ पृष्ठभागावर जमा होतात. त्यानंतर पाऊस पडल्यावर ते एकाच वेळी हवेत मिसळतात आणि सुगंध येतो. म्हणूनच उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पहिल्या पावसात मातीचा सुगंध जास्त येतो. या सुगंधाला 'पेट्रिकोर' (Petrichor) असं म्हणतात. १९६४ मध्ये आय. जे. बेअर आणि आर. जी. थॉमस या शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात हा शब्द पहिल्यांदा वापरला होता.
मग 'पेट्रिकोर' आणि 'जिओस्मिन' दोन्ही एकच आहेत का?
नाही. हे दोन्ही एकच आहेत असं समजणं चुकीचं ठरेल. पेट्रिकोर हा पावसानंतर मातीतून येणाऱ्या संपूर्ण सुगंधासाठी वापरला जाणारा शब्द आहे. तर जिओस्मिन हे त्या सुगंधाला कारणीभूत असणाऱ्या मुख्य संयुगांपैकी एक आहे. मातीचा सुगंध म्हणजे केवळ मातीचा वास नसून रसायने, सूक्ष्मजीव, वनस्पतींचे अवशेष आणि पावसाचे थेंब यांची एकत्र काम करण्याची एक रंजक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
