- Home
- lifestyle
- Washing Machine Tips : वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही स्वच्छ निघत नाहीत? तुम्ही 'ही' चूक तर करत नाही ना?
Washing Machine Tips : वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही स्वच्छ निघत नाहीत? तुम्ही 'ही' चूक तर करत नाही ना?
आजकाल प्रत्येकाच्या घरात वॉशिंग मशीन असतेच. पण मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही ते एकदम स्वच्छ का निघत नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडतो. यामागे नेमकी काय कारणे आहेत आणि ती कशी टाळायची?

मशीनच्या क्षमतेनुसारच कपडे टाका
वॉशिंग मशीनमुळे आपले रोजचे काम खूप सोपे झाले आहे. पण अनेकदा मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही त्यांचा मळ निघत नाही किंवा कपड्यांना कुबट वास येतो. यासाठी मशीन खराब झालीये, असा विचार करू नका. आपण कपडे धुताना काही चुका करत असू शकतो. सगळ्यात आधी, मशीनच्या क्षमतेपेक्षा जास्त कपडे एकाच वेळी टाकणे टाळा. कपडे जास्त असतील तर ते मशीनमध्ये नीट फिरू शकत नाहीत. त्यामुळे पाणी आणि डिटर्जंट सगळ्या कपड्यांपर्यंत पोहोचत नाही आणि कपडे अस्वच्छ राहतात. म्हणूनच, मशीनच्या क्षमतेनुसारच त्यात कपडे टाका.

डिटर्जंट किंवा लिक्विडचा अतिवापर
कपड्यांना मशीनमध्ये फिरण्यासाठी पुरेशी जागा मिळायला हवी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, डिटर्जंट किंवा लिक्विडचा अतिवापर करणे. जास्त फेस झाला म्हणजे कपडे जास्त स्वच्छ निघतील, हा समज चुकीचा आहे. जास्त डिटर्जंट वापरल्यास ते कपड्यांच्या धाग्यांमध्ये अडकून राहते आणि कपडे वाळल्यावर त्यावर पांढरे डाग दिसतात. काहींना या उरलेल्या डिटर्जंटमुळे त्वचेचा त्रासही होऊ शकतो. तसेच, खूप कमी डिटर्जंट वापरले तर मळ पूर्णपणे निघत नाही. त्यामुळे कपड्यांची संख्या आणि मळ पाहूनच योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरा.
कपड्यांच्या पोतानुसार पर्याय निवडा
कपड्यांच्या प्रकारानुसार योग्य वॉश सायकल निवडणे खूप गरजेचे आहे. जीन्स, ब्लँकेटसारखे जाड कपडे आणि सिल्कसारखे नाजूक कपडे एकाच सेटिंगवर धुणे चुकीचे आहे. कपड्यांच्या पोतानुसार कॉटन, डेलिकेट्स किंवा हेवी वॉश असा पर्याय निवडा. यामुळे कपड्यांचा दर्जा टिकून राहतो आणि मळही नीट निघतो. धुतलेले कपडे अनेक तास मशीनमध्येच ओले ठेवणे, ही आणखी एक मोठी चूक आहे. ओलाव्यामुळे तिथे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढते, ज्यामुळे कपड्यांना कुबट वास येतो. त्यामुळे कपडे धुतल्या धुतल्या लगेच बाहेर काढून वाळत घाला.
मशीन टब क्लीन फीचर
कपडे धुवून झाल्यावर वॉशिंग मशीनचा दरवाजा आणि डिटर्जंटचा ट्रे थोडा वेळ उघडा ठेवा, जेणेकरून आतला ओलावा कमी होईल. याशिवाय, मशीनच्या आतील भागाची नियमित स्वच्छता करणेही आवश्यक आहे. मशीन जास्त काळ वापरल्यास डिटर्जंटचे अवशेष, कपड्यांचे धागे आणि पाण्यातील क्षार आत जमा होतात. यामुळे दुर्गंधी येऊ शकते. कंपनीने सांगितल्यानुसार मशीनचा टब क्लीन फीचर वापरा. स्वतःच्या मनाने व्हिनेगर किंवा इतर केमिकल्स वापरण्यापेक्षा, मॅन्युअलमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे केव्हाही सुरक्षित असते.
फिल्टर तपासून स्वच्छ करा
फिल्टर आणि पाणी बाहेर जाणाऱ्या पाईपची योग्य काळजी घेणे, ही तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे. नाणी, दोरे, कपड्यांचे धागे आणि इतर लहान वस्तू फिल्टरमध्ये अडकल्यास पाणी बाहेर जाण्यास अडथळा येऊ शकतो. याचा परिणाम कपडे धुण्याच्या प्रक्रियेवर होतो. त्यामुळे मॅन्युअलमध्ये सांगितलेल्या वेळेनुसार फिल्टर तपासून स्वच्छ करा. फिल्टर काढण्यापूर्वी मशीन बंद करा आणि सुरक्षेची काळजी घ्या. मशीनमधून सतत दुर्गंधी येत असेल, पाणी नीट बाहेर जात नसेल किंवा कपडे धुतल्यावरही अस्वच्छ राहत असतील, तर लगेच तंत्रज्ञाची मदत घ्या.
या गोष्टी पाळाच
कपड्यांचा रंग उडू नये म्हणून पांढरे कपडे, रंगीत कपडे आणि नाजूक कपडे नेहमी वेगळे धुवावेत. योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरणे, कपड्यांनुसार वॉश सायकल निवडणे, ओले कपडे लगेच बाहेर काढणे आणि मशीन नियमित स्वच्छ करणे, या सोप्या सवयींमुळे कपडे एकदम स्वच्छ राहतात. तसेच मशीनचे आयुष्यही वाढते. या टिप्स फॉलो केल्यास कपड्यांना येणारा कुबट वास टळेल आणि तुमचे कपडे धुण्याचे काम अधिक सोपे आणि प्रभावी होईल.






