महागडी क्लिनिंग प्रोडक्ट्स न वापरता, घरच्या घरी सोप्या उपायांनी तुमची लाकडी फ्लोअरिंग शोरूमसारखी चमकवू शकता. व्हिनेगर, ऑलिव्ह ऑईल आणि योग्य क्लिनिंग टेक्निक वापरून फ्लोअरिंगची नैसर्गिक चमक कशी टिकवायची आणि ती दीर्घकाळ कशी जपायची, हे जाणून घ्या.
महागडे फ्लोअर क्लीनर आणि केमिकलने भरलेल्या फिनाईलशिवायही तुमची लाकडी फ्लोअरिंग (Wooden Floor) अगदी नव्यासारखी आणि शोरूममध्ये असते तशी चकचकीत दिसू शकते. अनेकांना वाटतं की लाकडी फ्लोअरिंग चमकवण्यासाठी महागडी उत्पादनं गरजेची असतात. पण खरं तर, योग्य पद्धत आणि घरात उपलब्ध असलेल्या सोप्या गोष्टी वापरूनही तुम्ही उत्तम रिझल्ट मिळवू शकता. लाकूड हे एक नाजूक मटेरियल आहे, त्यामुळे ते साफ करताना विशेष काळजी घ्यावी लागते, नाहीतर त्याची चमक कमी होऊ शकते किंवा पृष्ठभाग खराब होऊ शकतो. जर तुम्हालाही कमी मेहनतीत आणि कमी खर्चात तुमची वुडन फ्लोअरिंग चमकवायची असेल, तर हे सोपे आणि प्रभावी उपाय नक्कीच तुमच्या कामी येतील.


रोज कोरडी साफसफाई सर्वात महत्त्वाची
लाकडी फ्लोअरिंगची चमक टिकवण्यासाठी रोज धूळ काढणं खूप गरजेचं आहे. धूळ आणि मातीच्या कणांमुळे फ्लोअरिंगवर ओरखडे येऊ शकतात. यासाठी मऊ ब्रश किंवा मायक्रोफायबर झाडू वापरा. तुम्ही व्हॅक्युम क्लीनरही वापरू शकता, पण त्याचा ब्रश मऊ असल्याची खात्री करा.

कोमट पाण्याने फरशी पुसा
लाकडी फ्लोअरिंगवर जास्त पाण्याचा वापर करणं हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे फरशी पुसताना, कोमट पाण्यात कापड भिजवून ते घट्ट पिळून घ्या आणि मगच फरशी पुसा. जास्त ओल्या फडक्यामुळे लाकूड फुगून खराब होऊ शकतं.
व्हिनेगर आणि पाण्याचा नॅचरल क्लीनर
एका बादलीत २-३ चमचे पांढरं व्हिनेगर मिसळून तुम्ही एक नॅचरल क्लीनर तयार करू शकता. यामुळे फ्लोअरिंग स्वच्छ तर होतेच, पण त्याला एक नैसर्गिक चमकही येते. पण लक्षात ठेवा, व्हिनेगर जास्त प्रमाणात वापरू नका, नाहीतर लाकडाच्या थरावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
ऑलिव्ह ऑईलने नैसर्गिक चमक वाढवा
वुडन फ्लोअरिंगची गेलेली चमक परत आणण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करता येतो. एका कप पाण्यात १-२ चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि मऊ कापडाने हलक्या हाताने फ्लोअरिंग पुसून घ्या. यामुळे फ्लोअरिंगला नैसर्गिक चमक येते आणि ती नव्यासारखी दिसू लागते.
फर्निचर पॅड आणि मॅटचा वापर करा
फ्लोअरिंग जास्त काळ टिकवण्यासाठी फर्निचरच्या खाली पॅड लावा आणि घराच्या प्रवेशद्वारावर मॅट नक्की ठेवा. यामुळे धूळ आणि ओरखडे कमी होतील. हाय हील्स किंवा जड वस्तू थेट फरशीवरून ओढू नका, यामुळे फ्लोअरिंग लवकर खराब होऊ शकते.


