घरीच सोप्या पद्धतीने चमचमीत आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते जाणून घ्या. मोजक्याच साहित्यात तुम्ही हे लोणचं बनवू शकता, जे जेवणाची चव दुप्पट करेल.

मुंबई : आवळा म्हटलं की नुसतं नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं. आवळ्यामध्ये भरपूर गुणधर्म असतात आणि ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. तज्ज्ञसुद्धा रोज आवळा खाण्याचा सल्ला देतात. हे व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. जर तुम्हाला तिखट आणि चमचमीत खाण्याची आवड असेल, तर तुम्ही घरीच आवळ्याचं मस्त तिखट लोणचं बनवू शकता.

घरीच आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं याची स्टेप-बाय-स्टेप रेसिपी खालीलप्रमाणे:

साहित्य

  • २०० ग्रॅम आवळा
  • ५० ग्रॅम हिरवी मिरची
  • ५० ग्रॅम आलं
  • १ चमचा बडीशेप
  • १ चमचा पिवळी मोहरी
  • १ चमचा मेथी दाणे
  • १ चमचा जिरं
  • १ चमचा काळी मिरी
  • १ चमचा ओवा
  • अर्धी वाटी मोहरीचं तेल
  • अर्धा चमचा हिंग
  • अर्धा चमचा कलौंजी
  • चवीनुसार मीठ
  • १ चमचा हळद पावडर
  • २ चमचे लाल तिखट

कृती

  • सर्वात आधी आवळा पाण्यात स्वच्छ धुऊन त्याचे बारीक तुकडे करा. हिरवी मिरची आणि आलंही बारीक चिरून घ्या. आवळा, हिरवी मिरची आणि आलं मिक्सरमध्ये टाकून जाडसर वाटून घ्या. त्यानंतर हे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून ठेवा.
  • आता एक पॅन गरम करा. त्यात बडीशेप, पिवळी मोहरी, मेथी दाणे, जिरं, ओवा आणि काळी मिरी टाकून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. हे भाजलेले मसाले थंड झाल्यावर त्यात मीठ टाकून जाडसर वाटून घ्या.
  • त्यानंतर पॅनमध्ये मोहरीचं तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात हिंग आणि कलौंजी टाका, नंतर आवळा-मिरचीचं मिश्रण टाकून चांगलं मिक्स करा. मंद किंवा मध्यम आचेवर ५ मिनिटं शिजू द्या, जोपर्यंत त्यातलं पाणी कमी होत नाही आणि तेल सुटत नाही.
  • हे झाल्यावर त्यात काळं मीठ, हळद, लाल तिखट आणि भाजलेला मसाला टाकून मिक्स करा. झाकण ठेवून ते थंड होऊ द्या.

तुमचं आवडीचं आवळ्याचं लोणचं तयार आहे. पोळी, पराठा किंवा जेवणासोबत खाण्यासाठी हे एकदम परफेक्ट लोणचं आहे आणि रोजच्या व्हिटॅमिन सीसाठीही उत्तम आहे.

हिवाळ्यासाठी खास

सध्या हिवाळा सुरू आहे आणि या दिवसांत काहीतरी तिखट, चमचमीत खावंसं वाटतं. अशा वेळी जेवणासोबत आवळ्याचं लोणचं असेल, तर जेवणाची मजाच काही और असते. एवढंच नाही, तर आरोग्यासाठीही ते खूप चांगलं आहे, मग तुम्ही ते का ट्राय करू नये!