SIM Box Scam : CBIने नोएडा, दिल्ली आणि चंदीगडमध्ये सिम बॉक्स घोटाळ्यावर कारवाई करत 21 हजारांहून अधिक बेकायदेशीर सिम कार्ड जप्त केली असून, हा घोटाळा मोठ्या सायबर फसवणुकीचा भाग असल्याचे उघड झाले आहे.
SIM Box Scam : सायबर फसवणूक करणारे दिवसेंदिवस नवीन पद्धती शोधून सामान्य नागरिकांचे कष्टाचे पैसे लुटत आहेत. अशातच अलीकडे ‘सिम बॉक्स’ घोटाळा समोर आला असून, यामुळे देशभरात आर्थिक फसवणुकीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) नोएडा, दिल्ली आणि चंदीगड येथे सिम बॉक्स डिव्हाइसेस चालवणाऱ्या नेटवर्कवर मोठी कारवाई केली. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फिशिंग ऑपरेशनचा पर्दाफाश झाला असून, तब्बल 21,000 हून अधिक बेकायदेशीररीत्या मिळवलेले सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
सिम बॉक्स घोटाळा म्हणजे काय?
सिम बॉक्स हे एक असे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, ज्यामध्ये एकाच वेळी शेकडो सिम कार्ड वापरता येतात. या उपकरणाचा वापर करून फसवणूक करणारे आंतरराष्ट्रीय कॉल स्थानिक कॉल असल्याप्रमाणे दाखवतात. त्यामुळे टेलिकॉम शुल्क आणि नियम चुकवले जातात. याच सिम बॉक्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फिशिंग लिंक्स, बनावट कर्ज ऑफर्स आणि फसव्या गुंतवणूक योजनांचे एसएमएस नागरिकांना पाठवले जातात.
सिम बॉक्स घोटाळा कसा चालतो?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या घोटाळ्याची सुरुवात बनावट ओळखपत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात सिम कार्ड खरेदी करण्यापासून होते. ही सिम कार्ड सिम बॉक्समध्ये टाकून ती सर्व्हर आणि डोंगलशी जोडली जातात. त्यानंतर दररोज लाखो एसएमएस संदेश पाठवले जातात. यातील काही नागरिक फसव्या लिंक्सवर क्लिक करतात आणि त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जातात. CBIच्या तपासात असेही समोर आले आहे की परदेशातील सायबर गुन्हेगार भारतीय नागरिकांची फसवणूक करण्यासाठी या नेटवर्कचा वापर करत होते, ज्यामुळे हा घोटाळा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.
या घोटाळ्यामुळे होणारे नुकसान
सिम बॉक्स घोटाळ्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागते. यामध्ये थेट आर्थिक फसवणूक, बँक खात्यातून पैसे गायब होणे, तसेच आधार, पॅन यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती चोरी होण्याचा धोका असतो. ओळख चोरी (Identity Theft) झाल्यास पुढे आणखी गुन्ह्यांमध्ये व्यक्तीचे नाव वापरले जाऊ शकते, ज्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.
स्वतःचा बचाव कसा कराल?
सायबर फसवणुकीपासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. अनोळखी नंबरवरून आलेल्या एसएमएसमधील लिंक्सवर क्लिक करणे टाळावे. फसवणूक करणारे आकर्षक ऑफर्स देऊन लोकांना लिंक्सवर क्लिक करण्यास प्रवृत्त करतात. कोणताही संदेश आल्यास पाठवणाऱ्याचा नंबर तपासून पाहावा, कारण बनावट संदेश अनेकदा विचित्र किंवा यादृच्छिक नंबरवरून पाठवले जातात. संशयास्पद संदेश आल्यास त्वरित संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.


