घेवर ही एक पारंपरिक राजस्थानी मिठाई आहे जी खास करून तीज, रक्षाबंधन आणि श्रावण महिन्यात बनवली जाते. ही जाळीदार आणि कुरकुरीत मिठाई साजूक तुपात तळली जाते. याचीच रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
Ghewar Recipe for Shravan 2025 : घेवर ही एक पारंपरिक राजस्थानी मिठाई आहे, जी मुख्यतः तीज, रक्षाबंधन आणि श्रावण महिन्यात तयार केली जाते. ही मिठाई मैदा, तूप आणि साखरेच्या पाकात तयार केली जाते. घेवरचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जाळीदार आणि कुरकुरीत पोत, जो तळताना तयार होतो. त्यावर साखर पाक, रबडी आणि सुका मेवा घालून सजवले जाते. ही मिठाई थंड खाल्ल्यास अधिक स्वादिष्ट लागते. आजकाल घेवर अनेक प्रकारांमध्ये मिळतो, जसं की माळाई घेवर, केशर घेवर, रबडी घेवर इत्यादी. जाणून घेऊया घेवरची स्टेप बाय स्टेप रेसिपी सविस्तर…
साहित्य :
- मैदा – 1 कप
- तूप (वितळलेले) – 2 टेबलस्पून
- थंड दूध – 1/4 कप
- थंड पाणी – सुमारे 1.5 कप (गरजेनुसार)
- बर्फाचे तुकडे – 3-4
- साखर – 1 कप (साखर पाकासाठी)
- पाणी – 1/2 कप (साखर पाकासाठी)
- लिंबाचा रस – 1/2 टीस्पून
- साजूक तूप / तेल – तळण्यासाठी
- सजावटीसाठी रबडी, पिस्ता, बदाम, केशर, वेलची पूड
घेवरसाठी पीठ तयार करा :
- एका बाऊलमध्ये मैदा, वितळलेले तूप आणि थंड दूध घालून मिसळा.
- नंतर थोडे थोडे थंड पाणी घालत घोटका वापरून अतिशय पातळ, गुठळीविरहित पीठ तयार करा.
- त्यात 3-4 बर्फाचे तुकडे टाका आणि 10-15 मिनिटे सेट होऊ द्या.
तळण्याची पद्धत :
- खोलगट आणि जाड तळ असलेली कढई (घेवरसाठी खास वापरली जाते) अर्धी साजूक तुपाने/तेलाने भरून मध्यम आचेवर गरम करा.
- तेल खूप गरम झाल्यावर, एक मोठा चमचा पातळ पीठ घालून कढईत मधोमध ओता.
- पीठ टाकल्यावर मोठमोठ्या फोड्या तयार होतील.
- काही सेकंद थांबा, आणि पुन्हा त्याच जागेवर पीठ ओता.
- हे 4–5 वेळा करा, त्यामुळे घेवरचा आकार वाढेल आणि जाळी तयार होईल.
- वरून रंग थोडा बदलल्यावर हलक्या हाताने चमच्याने किंवा काट्याने घेवर बाहेर काढा आणि जाळीवर तेल निथळू द्या.
साखरेचा पार तयार करा
- एका पातेल्यात साखर आणि पाणी उकळवा.
- त्यात 1-2 थेंब लिंबाचा रस टाका.
- पाक एकतारी झाला की, गॅस बंद करा.
घेवरला सजवा :
- घेवर थोडा थंड झाल्यावर त्यावर साखर पाक ओता.
- नंतर वरून थोडी रबडी घाला (ऐच्छिक).
- सजावटीसाठी बदाम, पिस्ता काप, केशर आणि वेलची पूड शिंपडा.
- थोडा वेळ सेट होऊ द्या आणि थंडच सर्व्ह करा.
टीप :
- पीठ फारच पातळ असले पाहिजे, तरच छान जाळी तयार होते.
- एकच घेवर तळताना पीठ पुन्हा पुन्हा मध्यभागी ओता.
- घेवर फ्रेश खाल्ल्यास जास्त कुरकुरीत लागतो.
VIDEO : घेवरची संपूर्ण रेसिपी येथे व्हिडीओ स्वरुपात पाहा…


