पिंपल पॅचेस मुरुमं लवकर सुकवण्यासाठी आणि बॅक्टेरियापासून वाचवण्यासाठी मदत करतात. पिंपल पॅचेसचे फायदे काय आहेत आणि ते खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया.

स्किनकेअरमुळे फक्त त्वचा स्वच्छ राहत नाही, तर त्वचेच्या समस्याही कमी होतात. सध्या तरुणींमध्ये एक खास स्किनकेअर प्रोडक्ट खूपच लोकप्रिय होत आहे. ते म्हणजे पिंपल पॅचेस (Pimple Patches). हे छोटे, पारदर्शक स्टिकरसारखे दिसणारे पॅचेस थेट पिंपलवर किंवा मुरुमांवर लावले जातात. यामुळे पिंपल झाकला जातो आणि चेहऱ्याचा ग्लोही कायम राहतो. हे पॅचेस सहसा हायड्रोकोलॉइड (Hydrocolloid) नावाच्या मटेरियलपासून बनवलेले असतात. चला तर मग, हे पिंपल स्टिकर्स त्वचेची काळजी कशी घेतात आणि त्याचे फायदे काय आहेत, ते पाहूया.

पिंपल पॅचेस इतके लोकप्रिय का होत आहेत?

सध्या ऑनलाइन मार्केटमध्ये पिंपल पॅचेसना मोठी मागणी आहे. हे पॅचेस पिंपलमधील पस आणि घाण शोषून घेतात, ज्यामुळे तो लवकर सुकतो. जर याचा योग्य प्रकारे वापर केला, तर पिंपल पॅचेसमुळे मुरुमं लवकर बरी होतात आणि त्वचेवर डागही राहत नाहीत.

पिंपल पॅचेसचे फायदे काय आहेत?

  • हे पॅचेस पिंपलमधील द्रव आणि तेल शोषून घेतात, ज्यामुळे पिंपल लवकर सुकतो. यामुळे चेहऱ्यावरची लाली आणि सूज कमी होते.
  • पिंपल पॅच लावल्यामुळे बॅक्टेरियापासून संरक्षण मिळतं. यामुळे पिंपलवर बाहेरची धूळ, घाण बसत नाही आणि इन्फेक्शनचा धोका टळतो.
  • चेहऱ्यावर पिंपल आला की त्याला सारखं हात लावण्याचा मोह होतो. ही सवय टाळण्यासाठी पिंपल पॅचेस खूप उपयोगी ठरतात. यामुळे तुम्ही पिंपलला हात लावत नाही किंवा फोडत नाही, त्यामुळे डाग पडण्याची शक्यता कमी होते.
  • पिंपल पॅचेस पारदर्शक असल्यामुळे ते लावल्यानंतर तुम्ही मेकअपही करू शकता. हलक्या मेकअपखाली ते दिसतही नाहीत आणि चेहऱ्यावर पिंपल आहे हे कोणाला कळतही नाही.

पिंपल पॅचेस खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?

सॅलिसिलिक ॲसिड (Salicylic Acid), टी ट्री ऑइल (Tea Tree Oil) किंवा सेंटेला (Centella) यांसारखे घटक असलेले पिंपल पॅचेस निवडा. तसेच, पिंपलच्या आकारानुसार योग्य पॅच निवडा. खरेदी करताना चांगल्या ब्रँडची निवड करा आणि तुम्हाला कोणती स्किन ॲलर्जी नाही ना, हेही तपासून घ्या.