बहुतांश महिलांना पैठणी साडी नेसणे फार आवडते. पण एखाद्या जुन्या पैठणी साडीला तुम्ही नवा लूक देऊ शकता. सध्या पैठणीपासून इंडो-वेस्टर्न ड्रेस शिवण्याचा ट्रेन्ड आहे.
मुंबई : पैठणी ही महाराष्ट्राच्या समृद्ध आणि गौरवशाली परंपरेचे प्रतीक मानली जाते. ही साडी प्राचीन काळापासून महाराष्ट्रीय स्त्रियांच्या दागिन्यांसारखी जपली जाते. पैठणीच्या साड्या विशेषतः औरंगाबाद, येवला, नाशिक आणि पैठण या भागांमध्ये बनवल्या जातात. शुद्ध रेशीम आणि झळाळत्या झरीच्या सहाय्याने हाताने विणलेली पैठणी ही सौंदर्य, प्रतिष्ठा आणि संस्कृतीचे दर्शन घडवते. आधुनिक काळात पारंपरिक साड्यांना नव्या रूपात सादर करताना पैठणी साड्यांपासून तयार होणाऱ्या ड्रेसेसचा ट्रेंड प्रचंड गाजतो आहे.

आजकाल अनेक फॅशन डिझायनर्स आणि युवा डिझायनर मुली जुन्या पैठणी साड्यांपासून ड्रेस तयार करत आहेत. यामध्ये गाउन, लेहंगा-चोली, फ्रॉक, स्कर्ट-टॉप, कुर्ता, शरारा सेट, ब्लाऊज, तसेच इंडो-वेस्टर्न स्टाइल ड्रेस यांचा समावेश आहे. जुन्या पैठणींना नवा टच देण्याचा एक नवा ट्रेन्ड आहे. यामुळे जुनी साडी न फेकता तिचा वापर नवीन आणि युनिक प्रकारे करता येतो.
पैठणी ड्रेसमध्ये बहुतेक वेळा साडीचा काठ आणि पल्लू हे डिझाइनचे मुख्य आकर्षण असते. ड्रेस बनवताना पल्लूचा भाग गाऊनच्या बॉर्डरमध्ये, स्कर्टच्या झिपेस किंवा ओढणीमध्ये वापरला जातो. तर काही वेळा संपूर्ण साडीचा वापर करून एकसंध गाउन किंवा अनारकली ड्रेस तयार केला जातो. हे ड्रेस अत्यंत आकर्षक, रॉयल आणि उठावदार दिसतात. विशेष म्हणजे, यामध्ये पारंपरिकतेसोबत आधुनिक फॅशनचा सुरेख मिलाफ असतो.

सण, समारंभ, लग्नसमारंभ, नवरात्रोत्सव, गणपती, गुढीपाडवा यासारख्या विशेष प्रसंगी पैठणी ड्रेस परिधान करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हल्ली अनेक नववधू आपल्या सासरहून मिळालेल्या पैठणी साड्यांना ड्रेसच्या रूपात साकारते, जेणेकरून त्या साडीचा भावनिक आणि सांस्कृतिक वारसा कायम राहतो.पैठणी ड्रेस फक्त सुंदर दिसण्यासाठीच नाही, तर आपल्या संस्कृतीशी नातं जपण्यासाठीही एक उत्तम पर्याय ठरतो. आजच्या पिढीला पारंपरिक साड्यांऐवजी कंम्फर्ट आणि मॉडर्न लुक असलेले कपडे हवे असतात, त्यांच्यासाठी हे ड्रेस योग्य पर्याय आहेत.


