कांद्यावर काळी बुरशी असते ती आरोग्याला किती घातक असते, काळ्या बुरशीचा कांदा विकत घ्यावा का, नको हे सर्व काही सविस्तर यात दिलेले आहे. एक छोटीशी काळजी घेतली तर जेवणात चव आणणारा कांदा खरेदी करणे सोपे होईल.
मुंबई : कांदा हा किचनमध्ये अनेक पदार्थात वापरला जातो. जे कांदा खातात, त्यांना आहारात किंवा जेवण बनवताना कांदा वापरला नसेल तर त्या पदार्थाची पाहिजे तशी चव लागत नाही. आयुर्वेदात कांद्याला महत्व आहे. पण काळी बुरशी दिसत असलेला कांदा हा अनेकवेळा बाजारात येतो. वातावरणावर आधारीत हे पिक असते, मोठ्या प्रमाणात वातावरण खराब झालं, पावसाची वाणवा असेल, तर कांदा पिकाचं उत्पादन फार कमी होतं. अशावेळी चाळीत साठवलेला कांदा हा बाजारात येतो. चाळ म्हणजे थंड जागा तयार करुन साठवलेला कांदा. पण साठवलेल्या कांद्यावर ही काळी बुरशी येते.
कांद्याच्या टरफल्यावर ही बुरशी
पर्याय नसल्याने हा कांदा खरेदी करावा लागतो, पण कांद्याच्या टरफल्यावर ही बुरशी असते. ती आत खोलपर्यंत सहसा नसते, आणि ती बुरशी खोलपर्यंत गेली असेल, असं कांदा कापताना दिसलं, तर तो कांदा वापरु नका, तो खराब झालेला असतो. तर काळी बुरशी असलेला कांदा जेवण बनवताना वापरत असाल तर काही खबरदारी जरुर घ्या.
कांद्याच्या वरचं एक टरफलं
कांद्याच्या वरचं एक टरफलं काढून घ्या, यानंतरही आतल्या भागात कांद्यावर काळ्या रेषा दिसत असतील तर, नळाखाली चोळून तो कांदा चांगला स्वच्छ धुवा यानंतरच तो वापरा. पण कांदा नरम पडला आहे, त्यात एका बाजूला पाणी झालं आहे, तर असा कांदा वापरु नका. कांदा नेहमी धुवूनच वापरा. कारण चाळीत थंड जागेत साठवलेल्या जागेत कीटकनाशकं वापरली जातात. कांदा जास्त दिवस टिकावा म्हणून काही हलक्या किटकनाशक पावडरचा वापर केला जातो.
USDA काही गाईडलाईन दिलेल्या आहेत
मग ही काळी बुरशी आरोग्याला एवढी घातक नाहीय का, असा प्रश्न तुम्हाला पडेल, पण जर ज्यांनी अॅलर्जी आहे, दम्याचा आजार आहे. त्यांच्या श्वसनमार्गात हे बुरशीचे कण नाकाद्वारे आत गेल्यास त्यांना शिंका, श्वास आणि कफ तयार होऊन खोकला लागतो, पण ज्यांची रोगप्रतिकारशक्ती फार कमी आहे, त्यांच्या बाबतीत हे लागू आहे. अॅस्परगिलस नायजर' (Aspergillus niger) ही काळी बुरशी (Black Mold) आहे. अमेरिकेच्या USDA काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्यानुसार धुवून तुम्ही कांदा वापरु शकतात.
जमीनीतली ही बुरशी कांद्यावर
पण बुरशी सहज डोळ्याने ओळखली जात नाही, थंड वातावरणात साठा करताना जमीनीतली ही बुरशी कांद्यावर येते. तेव्हा धुवूनच कोणताही कांदा वापरला तर तो सुरक्षित आहे. कांदा जेवणाला चव आणतो, अशी काही लोकांची मतं आहेत. तेव्हा कांद्याचा वापर जेवणात फार मोठ्या प्रमाणात भारतीय करत असतात.
खरे कारण शोधणे गरजेचे
काळी बुरशीचा कांदा वापरल्याने एका महिलेचा जीव गेला, वैगरे अशा बातम्या काही लोकल ठिकाणी येत असतात, पण त्यामागे खरे कारण शोधणे गरजेचे आहे. पण कांद्यावरची काळी बुरशी काढून फेकून दिली आणि त्याला स्वच्छ धुतल्यानंतर बुरशी दिसत नसेल तर तो खाण्यायोग्य आहे.
महिनाभर साठवलेल्या कांद्याला ही बुरशी
भारतात दरवर्षी कांदा उत्पादन कमी जास्त प्रमाणात होत असते, तेव्हा कांद्याला कमी भाव असेल तेव्हा शेतकरी त्याची साठवणूक करतात आणि भाव वाढल्यावर बाजारात विकतात, या काळात ही काळी बुरशी चढते. महिनाभर साठवलेल्या कांद्याला ही बुरशी येत नाही. पण जास्त काळ साठवलेल्या कांद्याला ही बुरशी येते. पण ती घातक नसते, जर तुम्ही ती काढून फेकून दिली, कांद्याच्या टरफल्यासह. हॉटेल चालकांनी देखील ही काळजी घेतली पाहिजे.

