Margashirsha Guruvar 2025 : मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अत्यंत शुभ मानले जातात. विष्णू आणि गुरु ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी हा काळ उत्तम असून पूजा, व्रत आणि पिवळ्या वस्तुंचा वापर केल्याने घर-परिवाराचे कल्याण होते. 

Margashirsha Guruvar 2025 : मार्गशीर्ष महिना हा हिंदू पंचांगातील अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो. या महिन्यात येणारे गुरुवार अधिक शुभ, मंगलकारक आणि फलदायी मानले जातात. भगवान विष्णूची अत्यंत प्रिय असा मानल्या जाणारा हा कालखंड अध्यात्म, संपत्ती, सौख्य आणि सद्भाग्य वाढवणारा असल्याचे धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन आहे. मार्गशीर्षातील गुरुवारी पूजा केल्याने घरात आनंद, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते, असे मानले जाते. स्त्रियांसाठीही हा महिना विशेष शुभ मानला जातो आणि सौभाग्यवृद्धीसाठी अनेकजणी या दिवसाचे व्रत करतात.

यंदा मार्गशीष कधी? 

यंदा मार्गशीष महिना येत्या 27 नोव्हेंबरला सुरू होणार असून शेवटचा गुरूवार 18 डिसेंबरला आहे. या महिन्यात बहुतांश महिला उपवास करतात. 

मार्गशीर्षातील गुरुवारचे धार्मिक महत्व

मार्गशीर्ष हा स्वयं भगवान श्रीकृष्णाने पवित्र मानलेला महिना आहे. भगवद्गीतेमध्येही “मासानां मार्गशीर्षोऽहम्” असे म्हणत श्रीकृष्णाने या महिन्याचे महत्व अधोरेखित केले आहे. या महिन्यातच्या गुरुवारांच्या पूजेमुळे गुरु ग्रहाची कृपा प्राप्त होते. गुरु म्हणजे ज्ञान, अध्यात्म, धनलाभ आणि कौटुंबिक कल्याणाचा कारक ग्रह. मार्गशीर्षातील गुरुवारी उपवास किंवा पूजा केल्याने अडचणी दूर होतात, घरातील तणाव कमी होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विवाहित महिलांसाठी हा महिना विशेष महत्त्वाचा असून अखंड सौभाग्य आणि पतीचे दीर्घायुष्य मिळावे यासाठी या दिवशी व्रत केले जाते.

गुरुवारी करावयाची पूजा विधी

मार्गशीर्षातील गुरुवारी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू किंवा दत्तात्रेयांची पूजा करावी. पिवळे फुल, हळद-कुंकू, पिवळे अक्षता आणि पंचॉपचार किंवा षोडशोपचार पद्धतीने देवतेची आराधना करावी. गुरुवारी बेसन लाडू, खीर किंवा पिवळ्या रंगाची प्रसादाची नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते. दिवा लावताना तूपाचा वापर करणे विशेष फलदायी मानले गेले आहे. पूजा झाल्यानंतर गुरुवारची कथा वाचणे किंवा विष्णू सहस्रनाम पठण करणे अधिक शुभ परिणाम देणारे आहे.

व्रताचे नियम आणि विशेष प्रथा

या दिवशी शक्यतो पिवळा रंग परिधान करावा, पिवळ्या वस्तू दान कराव्यात आणि राग, कटू वाणी, तिखट पदार्थ वर्ज्य करावेत. व्रत करणाऱ्यांनी दिवसातून एकदाच फळाहार किंवा उपवास करावा. संध्याकाळी पुन्हा देवतेची आरती करून प्रसाद ग्रहण करावा. काही जण या दिवशी तुळशीला जल अर्पण करतात व तुळशीच्या रोपाजवळ दीपदान करतात. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार असेच पाळल्यास व्रत पूर्णत्वास जाते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते.

मार्गशीर्ष गुरुवाराचे फायदे

या व्रतामुळे घरात शांतता, समृद्धी आणि धनलाभ वाढतो, असे धार्मिक मान्यता सांगते. गुरु ग्रहाच्या कृपेने विद्यार्थ्यांना शिक्षणात यश, नोकरी-व्यवसायात प्रगती, विवाहयोग्य मुला-मुलींना योग्य जोडीदार मिळण्यास मदत होते. विवाहित स्त्रियांसाठी हे व्रत सौभाग्यवर्धक आहे. मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नती या व्रतामुळे वाढते. जीवनातील अडथळे कमी होऊन शुभ कार्यांना पूरक अशी परिस्थिती निर्माण होते.