दुबईतील रिअल इस्टेटची नोकरी सोडून इशान ग्रोवर नावाचा तरुण उत्तराखंडच्या डोंगरांमध्ये स्थायिक झाला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला जीवनाचा खरा अर्थ कळला आणि त्याने कासार देवीमध्ये 'Thoda Slow' नावाचं छोटंसं दुकान सुरू केलं.

देहरादून : दुबईमधलं ऐशोआरामाचं आयुष्य आणि रिअल इस्टेटमधली गलेलठ्ठ पगाराची नोकरी... हे सगळं सोडून एक तरुण थेट उत्तराखंडच्या डोंगरांमध्ये स्थायिक झाला. इशान ग्रोवर असं या तरुणाचं नाव असून, त्याची गोष्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आणि शांततेच्या शोधात आपण इथपर्यंत पोहोचलो, असं इशान सांगतो.

डोंगरांमध्ये सापडली शांतता

कंटेंट क्रिएटर हिमांशू खोसलाने त्याच्या 'Unfiltered Life' या सोशल मीडिया सिरीजमध्ये इशानची गोष्ट एका व्हिडिओतून लोकांपर्यंत पोहोचवली. इशान सांगतो, "वडिलांना कॅन्सर झाला होता, तेव्हा हॉस्पिटलच्या वाऱ्या करताना आयुष्य जवळून पाहिलं. त्या अनुभवाने शहरातल्या धावपळीच्या आयुष्याबद्दलची माझी मतं बदलली. मला डोंगरांमध्येच खरी शांतता मिळते हे जाणवलं."

View post on Instagram

दुबई ते उत्तराखंड

दुबईमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणारा इशान जेव्हा उत्तराखंडमध्ये आला, तेव्हा तो इथल्या वातावरणाच्या प्रेमातच पडला. त्यानंतर त्याने कासार देवी या ठिकाणी 'Thoda Slow' नावाचं एक छोटंसं दुकान सुरू केलं. नावाप्रमाणेच, थोडं हळू आणि शांत आयुष्य जगण्याचा संदेश तो या दुकानातून देतो. शहरातली धावपळ आणि तणाव मागे सोडून स्वतःच्या मर्जीने जगण्याचा निर्णय इशानने घेतला आहे. 'आयुष्यात खूप पळालो', या एका विचाराने त्याला हा बदल घडवण्यास प्रवृत्त केलं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांना आवडला असून, अनेकांनी त्याच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. शांत आणि साधं आयुष्य जगण्याला त्याने दिलेलं महत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.