- Home
- lifestyle
- Kalonji vs Black Sesame : काळ्या तिळासारखे दिसणारे कलौंजीचे बी आणि काळे तीळ यात नेमका फरक काय?
Kalonji vs Black Sesame : काळ्या तिळासारखे दिसणारे कलौंजीचे बी आणि काळे तीळ यात नेमका फरक काय?
Kalonji Seeds Vs Black Sesame Seeds: काळे तीळ आणि कलौंजीचे बी (Kalonji Seeds) दिसायला अगदी सारखेच असतात. त्यामुळे पहिल्यांदा बघितल्यावर कुणालाही यातला फरक लवकर समजत नाही. पण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत का? आणि कशासाठी कोणता पदार्थ वापरावा?

Kalonji seeds
भारतीय खाद्यपदार्थ म्हटले की डोळ्यांसमोर येतात ते खमंग आणि चविष्ट पदार्थ. या चवीमागचं खरं रहस्य आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्यांमध्ये लपलेलं असतं. पण काही मसाले दिसायला अगदी हुबेहूब असतात, ज्यामुळे आपला गोंधळ उडतो. यामध्ये कलौंजी आणि काळे तीळ या दोन गोष्टी प्रामुख्याने येतात. हे दोन्ही पदार्थ दिसायला सारखेच असतात. रंगाने काळे आणि आकाराने लहान असतात. पण त्यांची चव, वास आणि आरोग्यासाठी होणारे फायदे यात खूप मोठा फरक आहे. मग यांच्यातला फरक काय आहे? आणि रोजच्या स्वयंपाकात यांचा वापर कसा करावा?

कलौंजीचे बी...
कलौंजीच्या बियांना शास्त्रीय भाषेत निजेला सॅटिवा (Nigella sativa) म्हणतात. अनेक लोक याला कांद्याचे बी असंही म्हणतात. बंगाली पदार्थांमध्ये याचा आवर्जून वापर केला जातो. या बिया आकाराने लहान आणि काळ्या रंगाच्या असतात. या बियांमध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. यात जीवनसत्त्वे, प्रथिने आणि अमिनो ॲसिडसोबतच अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्मही असतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी सकाळी कलौंजीचे बी भिजवलेले पाणी पिणे फायदेशीर ठरते. तसेच केस वाढण्यासाठीही या बिया मदत करतात.
रोजच्या स्वयंपाकात कलौंजी कशी वापरतात?
वरण किंवा चटणी अधिक चविष्ट बनवायची असेल, तर तेलात कढीपत्ता आणि हिंगासोबत थोडे कलौंजीचे बी घालून फोडणी द्या. याच्या सुगंधामुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते. कचोरीचे सारण बनवताना जिरे आणि इतर मसाल्यांसोबत कलौंजी भाजून घातल्यास त्याची चव खूप छान लागते. आपण आवडीने खाणाऱ्या आंब्याच्या किंवा इतर लोणच्यात जे काळे दाणे दिसतात, ते कलौंजीचेच असतात. यामुळे लोणच्याला एक खास तिखट आणि वेगळी चव मिळते.
काळे तीळ...
तिळामध्ये प्रामुख्याने पांढरे आणि काळे असे दोन प्रकार असतात. काळ्या तिळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते, म्हणूनच हिवाळ्यात या तिळाचा जेवणात जास्त वापर केला जातो. पांढऱ्या तिळाच्या तुलनेत काळ्या तिळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. याव्यतिरिक्त यात प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, मँगनीज, फायबर आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच हिवाळ्यात ताकदीसाठी लोक काळ्या तिळाचे लाडू खातात.
रोजच्या स्वयंपाकात काळ्या तिळाचा वापर:
तुम्ही बनवलेल्या व्हेजिटेबल सॅलडवर थोडे काळे तीळ भुरभुरा. यामुळे सॅलडमधील पोषक घटक तर वाढतातच, पण खाताना एक छान कुरकुरीत चवही येते. मफिन्स, कुकीज किंवा बिस्किटे बेक करताना सजावटीसाठीही याचा वापर करता येतो. तसेच नान, कुलचा किंवा पराठ्यांवर काळे तीळ लावून भाजल्यास चवही चांगली लागते आणि आरोग्यालाही फायदा होतो.
दोन्हीमधला फरक कसा ओळखायचा?
कलौंजीचे बी थोडे त्रिकोणी आकाराचे आणि खडबडीत असते, आणि त्याला एक उग्र वास असतो (कांदा आणि मिरी एकत्र असल्यासारखा). तर काळे तीळ गुळगुळीत आणि चपटे असतात, आणि ते चावल्यावर छान तेलाची चव येते. आता यापुढे स्वयंपाकघरात हे पदार्थ पाहताना कोणताही गोंधळ न करता त्यांचा वापर करा.

