- Home
- lifestyle
- Dal Cooking Tips: डाळ शिजवताना वर येणारा पांढरा फेस धोकादायक असतो का? डाळ नेमकी कशी शिजवावी?
Dal Cooking Tips: डाळ शिजवताना वर येणारा पांढरा फेस धोकादायक असतो का? डाळ नेमकी कशी शिजवावी?
तुम्ही डाळ कशी शिजवता? डाळ शिजवताना त्यावर येणारा पांढरा फेस तुम्ही कधी पाहिलाय का? हा फेस आरोग्यासाठी चांगला असतो की वाईट? असा फेस आलेली डाळ खावी की नाही? जाणून घ्या.

डाळ शिजताना आलेला फेस चांगला की वाईट?
आपल्याकडे रोजच्या जेवणात डाळ असतेच. डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण डाळ शिजवताना त्यावर एक पांढरा फेस किंवा थर जमा झालेला आपण नेहमी पाहतो. अनेक जण हा फेस आरोग्यासाठी हानिकारक समजतात आणि तो काढून टाकतात. पण खरंच हा फेस आरोग्यासाठी चांगला असतो की वाईट? यावर तज्ज्ञ काय सांगतात ते आपण पाहूया.

फेसात अनेक घटक असतात
तुम्ही डाळ पातेल्यात शिजवा किंवा कुकरमध्ये, त्यावर पांढरा फेस येतोच. हा फेस येणं अगदी नैसर्गिक आहे. डाळीतील प्रथिने (प्रोटीन्स) आणि पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेट्स) जेव्हा गरम पाण्यात मिसळतात, तेव्हा हा फेस तयार होतो. अनेक जण हा फेस खराब समजून चमच्याने काढून टाकतात. पण या फेसामध्ये प्रोटीन्स आणि स्टार्चसोबतच 'सॅपोनिन्स' (Saponins) नावाचे घटक असतात.
या सॅपोनिन्समध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-कोलेस्ट्रॉल गुणधर्म भरपूर असतात. हा फेस कमी प्रमाणात असेल, तर त्याचे शरीराला फायदेच होतात. पण जर फेस खूप जास्त आला, तर डाळ कडू लागते. शिवाय, जास्त फेस असलेली डाळ खाल्ल्यास पोटाचे आजार होऊ शकतात.
डाळ शिजण्याआधी भिजवावी
अनेकांना डाळ खाल्ल्यावर पोट फुगण्याचा किंवा गॅसचा त्रास होतो. याचं मुख्य कारण म्हणजे डाळीत असलेले 'FODMAPs' नावाचे कार्बोहायड्रेट्स. हे घटक लहान आतड्यात नीट पचत नाहीत आणि मोठ्या आतड्यात जाऊन बॅक्टेरियाद्वारे फर्मेंट (किण्वन) होतात. यामुळेच गॅस, पोटदुखी आणि अस्वस्थता जाणवते. डाळ कच्ची राहिली तरी हा त्रास होतो. त्यामुळे डाळ नेहमी मऊ शिजवूनच खावी.
डाळ खाल्ल्यावर गॅस होऊ नये आणि ती सहज पचावी यासाठी डाळ जास्त वेळ भिजत ठेवावी. शिजवण्यापूर्वी डाळ २० ते ४० मिनिटे भिजत ठेवा आणि ते पाणी फेकून द्या. यामुळे त्रास देणारे घटक निघून जातात. अनेक जण आरोग्यासाठी डाळ पातेल्यात शिजवतात, पण डाळ नेहमी प्रेशर कुकरमध्येच शिजवावी. कुकरमध्ये शिजवल्याने डाळीतील फायबर आणि प्रोटीन्स मऊ होतात आणि ती सहज पचते.

