- Home
- lifestyle
- Intermittent Fasting : इंटरमिटंट फास्टिंगने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या योग्य पद्धत आणि वेळापत्रक
Intermittent Fasting : इंटरमिटंट फास्टिंगने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या योग्य पद्धत आणि वेळापत्रक
वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंगचा ट्रेंड सध्या खूप जोरात आहे. पण यामध्ये 12:12, 14:10, 16:8 आणि 18:6 हे प्रकार नक्की काय आहेत? ते कसे पाळायचे, कोणासाठी कोणते योग्य आहे आणि काय काळजी घ्यावी?

Intermittent Fasting: इंटरमिटेंट फास्टिंग खरंच एवढं फायदेशीर आहे का?!
वजन कमी करायचंय, पोटाची चरबी घटवायचीय आणि निरोगी जीवनशैली जगायचीय, अशा लोकांचं लक्ष वेधून घेणारी एक आहार पद्धत म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग (Intermittent Fasting). ठराविक वेळेतच जेवायचं आणि उरलेला वेळ काहीही न खाता राहणं, हा या पद्धतीचा मूळ पाया आहे.
इतर नेहमीच्या डाएट प्लॅन्ससारखं यात फक्त 'काय खावं' यावर भर दिला जात नाही, तर 'कधी खावं' यालाही तितकंच महत्त्व दिलं जातं. यामध्ये 12:12, 14:10, 16:8 आणि 18:6 असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारात जेवणाची वेळ आणि उपवासाची वेळ वेगवेगळी असते.

12:12 इंटरमिटेंट फास्टिंग – नवशिक्यांसाठी उत्तम पर्याय!
पहिल्यांदाच इंटरमिटेंट फास्टिंगचा प्रयोग करणाऱ्यांसाठी 12:12 चा नियम सोपा ठरू शकतो. यात 12 तास काहीही न खाता राहायचं असतं. पुढच्या 12 तासांत तुम्ही तुमचं नेहमीचं जेवण घेऊ शकता.
उदाहरणार्थ, सकाळी 8 वाजता नाश्ता करून, रात्री 8 वाजेपर्यंत तुमचं रात्रीचं जेवण उरकू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत काहीही खाऊ नये.
यामुळे रात्रीच्या वेळी विनाकारण जंक फूड खाणं टळतं. जेवणाच्या वेळा पाळण्यासाठी आणि निरोगी सवयी लावण्यासाठी हा प्रकार खूप फायदेशीर ठरतो.
14:10 इंटरमिटेंट फास्टिंग – पुढचं पाऊल!
12:12 ची सवय झाल्यानंतर तुम्ही 14:10 चा प्रयोग करू शकता. यात 14 तास उपवास करायचा असतो. उरलेल्या 10 तासांत तुम्ही तुमचं जेवण करू शकता.
उदाहरणार्थ, सकाळी 9 ते रात्री 7 या वेळेत तुम्ही जेवू शकता. रात्री 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत काहीही खाऊ नये.
या प्रकारात जेवणाची वेळ थोडी कमी केली जाते. जेवणामधील अनावश्यक खाणं कमी करून, खाण्याच्या सवयी सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.
16:8 इंटरमिटेंट फास्टिंग – सर्वात लोकप्रिय पद्धत!
इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये सर्वात जास्त चर्चा होते ती 16:8 या नियमाची. यात 16 तास काहीही न खाता राहायचं असतं. उरलेल्या 8 तासांत नाश्ता, दुपारचं जेवण आणि आवश्यक स्नॅक्स यांचं नियोजन करून तुम्ही ते खाऊ शकता.
उदाहरणार्थ, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत जेवण करून, संध्याकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्ही उपवास करू शकता.
योग्य आहाराची निवड, पुरेशी प्रथिने, भाज्या, फळे आणि फायबरयुक्त पदार्थांसह या पद्धतीचा अवलंब करणं महत्त्वाचं आहे. काही लोकांना वजन आटोक्यात ठेवण्यासाठी याची मदत होऊ शकते. तरीही, सर्वांनाच याचे एकसारखे फायदे मिळतील असं सांगता येत नाही.
18:6 इंटरमिटेंट फास्टिंग – अनुभव असणाऱ्यांसाठी!
या प्रकारात 18 तास उपवास करून, उरलेल्या 6 तासांत जेवण पूर्ण करावं लागतं.
उदाहरणार्थ, दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या वेळेत जेवण करू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत उपवास करावा लागतो.
इतर प्रकारांच्या तुलनेत हा प्रकार थोडा कठीण आहे. जेवणाची वेळ कमी असल्याने, शरीराला लागणाऱ्या कॅलरीज, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळत आहेत ना, याची खात्री करावी लागते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अचानक या पद्धतीचा अवलंब करणं योग्य नाही.
इंटरमिटेंट फास्टिंग करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
- उपवासाच्या वेळी भरपूर पाणी प्यावं. जेवणाच्या वेळेत पौष्टिक आणि समतोल आहार घ्यावा.
- जास्त तेलकट, गोड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. पुरेशी झोप आणि व्यायामालाही महत्त्व द्यावं.
- शारीरिक थकवा, चक्कर येणं असा त्रास जाणवल्यास उपवास थांबवून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोणी काळजी घेणं गरजेचं आहे?
गर्भवती महिला, स्तनदा माता, आहाराशी संबंधित समस्या असणारे, मधुमेहाची औषधं किंवा इन्सुलिन घेणारे रुग्ण यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा प्रयोग करू नये. जास्त वेळ उपाशी राहिल्याने काहींना त्रास होऊ शकतो.
हे फक्त खाणं कमी करणं नाही
इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे फक्त खाणं कमी करणं नाही; तर जेवणाच्या वेळा पाळण्याची एक जीवनशैली आहे. 12:12, 14:10, 16:8, 18:6 असे अनेक प्रकार असले, तरी सर्वांनाच एक पद्धत लागू होत नाही. शारीरिक स्थिती, वय, रोजचं काम आणि खाण्याच्या सवयींनुसार योग्य पद्धत निवडणं महत्त्वाचं आहे. वेगाने वजन कमी करण्याच्या नादात जास्त वेळ उपाशी राहणं टाळावं आणि डॉक्टर किंवा तज्ज्ञ आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच निरोगी बदल करावेत.
