रात्री झोपताना तासन् तास रील्स पाहणं ही आता खूप कॉमन सवय झालीये. यामुळे झोप तर मोडतेच, पण दुसऱ्या दिवशी थकवाही जाणवतो. या ५ सोप्या टिप्स वापरून तुम्ही ही सवय सहज सोडू शकता.
मुंबई : रात्री ११ वाजता आपण ठरवतो की फक्त ५ मिनिटं रील्स पाहू आणि झोपू. पण बघता बघता रात्रीचा १ वाजतो आणि फोन काही हातातून सुटत नाही. तुमच्यासोबतही रोज असंच होतं का? टेन्शन घेऊ नका, तुम्ही एकटे नाही आहात. तज्ज्ञ या रात्री उशिरापर्यंत फोन पाहण्याच्या सवयीला 'रिव्हेंज बेडटाइम प्रोक्रॅस्टिनेशन' (revenge bedtime procrastination) म्हणतात. दिवसभर काम केल्यानंतर रात्रीचा वेळ हाच आपला स्वतःचा वेळ आहे, असं आपल्याला वाटतं. पण ही ५ मिनिटं तुमची झोप, शांतता आणि दुसऱ्या दिवशीची एनर्जी हिरावून घेतात.
फोनमधून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे मेंदूमध्ये मेलाटोनिन हार्मोन तयार होणं थांबतं. यामुळे झोप यायला उशीर होतो. शिवाय, एकामागून एक येणारे शॉर्ट व्हिडिओज तुमच्या मेंदूला सतत अलर्ट ठेवतात. यामुळे तुम्हाला गाढ झोप लागत नाही. ही सवय मोडण्यासाठी फक्त इच्छाशक्ती पुरेशी नाही, तर काही स्मार्ट ट्रिक्स वापरणं गरजेचं आहे.
१. १०-३-२-१ फॉर्म्युला वापरा:
झोपेचे तज्ज्ञ हा फॉर्म्युला आवर्जून वापरण्याचा सल्ला देतात. झोपण्यापूर्वी १० तास आधी चहा किंवा कॉफीसारखे कॅफीनयुक्त पदार्थ घेणं थांबवा. झोपण्यापूर्वी ३ तास आधी जड जेवण आणि अल्कोहोल टाळा. झोपण्यापूर्वी २ तास आधी ऑफिसचं काम थांबवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, झोपण्यापूर्वी १ तास आधी सर्व स्क्रीन्स बंद करा. हा शेवटचा १ तास खूप महत्त्वाचा असतो. या वेळात तुमचा फोन बेडपासून लांब ठेवा.
२. तुमचा फोन कंटाळवाणा बनवा:
रात्री १० नंतर तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. तिथे ग्रेस्केल (Grayscale) किंवा ब्लॅक अँड व्हाईट मोड आणि बेडटाइम मोड ऑन करा. रंगीबेरंगी रील्स जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट दिसू लागतील, तेव्हा तुमच्या मेंदूला त्यात काहीच मजा येणार नाही. आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही फोनमध्ये या सेटिंग्ज असतात. याशिवाय, सर्व सोशल मीडिया अॅप्सवर रोज ३० मिनिटांची लिमिट सेट करा.
३. फोनची जागा बदला:
ही सर्वात सोपी पण पाळायला कठीण अशी स्टेप आहे. तुमचा फोन बेडजवळ न ठेवता दुसऱ्या रूममध्ये किंवा लांबच्या कोपऱ्यात चार्जिंगला लावा. फोन हाताच्या अंतरावर नसेल, तर तुम्ही रील्स उघडणारच नाही. सकाळी उठण्यासाठी तुम्ही २०० रुपयांचं साधं अलार्म घड्याळ विकत घेऊ शकता. फक्त अलार्मसाठी फोन बेडवर ठेवणं आताच थांबवा.
४. रील्सऐवजी नवीन सवय लावा:
तुमचा मेंदू रिकामा ठेवू नका. रील्स पाहण्याऐवजी एखादं पुस्तक हातात घ्या. फक्त ५ पानं वाचली तरी तुम्हाला झोप येऊ लागेल. तुम्ही हलकं मेडिटेशन करू शकता, डायरी लिहू शकता किंवा दुसऱ्या दिवशीची टू-डू लिस्ट बनवू शकता. बेडवर रील्स स्क्रोल करण्यापेक्षा गोष्टींची पुस्तकं वाचायला सुरुवात करा.
५. स्वतःला विचारा, तुम्ही हे का पाहताय?:
आपण अनेकदा कंटाळा आलाय किंवा स्ट्रेस आहे म्हणून रील्स पाहतो. जेव्हाही तुम्हाला रील्स उघडावेसे वाटतील, तेव्हा स्वतःला १० सेकंद द्या. स्वतःला विचारा की हे पाहिल्याने तुम्हाला बरं वाटेल की वाईट. याचं उत्तर बहुतांश वेळा 'वाईट' असंच असेल. ही छोटीशी जाणीव तुम्हाला रील्स पाहण्यापासून नक्की थांबवेल.
ही सवय एका दिवसात बदलणार नाही. आजपासून फक्त १५ मिनिटं आधी फोन बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. ७ दिवसांनंतर तुम्हाला तुमच्या झोपेच्या दर्जामध्ये खूप मोठी सुधारणा दिसेल. शिवाय, सकाळी उठल्यावर तुम्हाला खूप फ्रेश वाटेल.


