घरातल्या घरात कांद्याच्या सालींपासून ऑरगॅनिक खत कसं बनवायचं? जाणून घ्या सोप्या पद्धती. या लिक्विड फर्टिलायझर आणि कंपोस्ट खतामुळे झाडांची वाढ तर होतेच, पण फुलंही लवकर येतात.
तुम्हालाही तुमच्या बागेत ऑरगॅनिक म्हणजे सेंद्रिय भाज्या उगवायला आवडत असतील, तर तुम्ही रासायनिक खतांऐवजी ऑरगॅनिक खतच वापरायला हवं. बागेतल्या किंवा कुंड्यांमधल्या झाडांना निरोगी ठेवायचं असेल, तर किचनमधल्या कचऱ्याचा योग्य वापर करायला शिका. तुमच्या घरात रोज कांद्याची सालं नक्कीच निघत असतील. ही सालं एकत्र करून तुम्ही घरीच एक उत्तम खत तयार करू शकता. हवं तर कांद्याच्या घाऊक दुकानातूनही कांद्याची सालं आणून तुम्ही घरी खत बनवू शकता.
कांद्याच्या सालींमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे झाडांची वाढ व्हायला चांगली मदत होते. हे खत केवळ जमिनीची सुपीकता वाढवत नाही, तर झाडांनाही मजबूत बनवतं. चला तर मग, जाणून घेऊया घरी कांद्याच्या सालींपासून लिक्विड खत कसं बनवायचं.
कांद्याच्या सालींचं पाणी
सगळ्यात आधी एक मूठभर कांद्याची सालं घ्या आणि ती १ लिटर पाण्यात २४ तास भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळणीने गाळून घ्या. हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा किंवा थेट झाडांच्या मुळांमध्ये टाका. तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन वेळा असं करू शकता. काही दिवसांतच तुम्हाला कांद्याच्या पाण्याचा परिणाम दिसू लागेल. तुम्ही हवं तर कांद्याच्या सालींपासून कंपोस्ट खतही बनवू शकता. त्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे.
कांद्याच्या सालींपासून कंपोस्ट खत बनवण्याची पद्धत
कंपोस्ट खत बनवण्यासाठी, सर्वात आधी कांद्याची सालं उन्हात चांगली वाळवून घ्या. नंतर ती किचनमधला ओला कचरा आणि मातीसोबत एकत्र करा. तुम्ही एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ओला कचरा आणि कांद्याच्या सालींचा थर लावू शकता. साधारण २ ते ३ आठवडे हे मिश्रण कुजायला ठेवा. त्यानंतर हे खत तुम्ही कुंडी आणि बाग दोन्हीसाठी वापरू शकता.
कांद्याच्या सालींच्या खताचे फायदे
कांद्याच्या सालींचा खत म्हणून वापर केल्याने झाडांची वाढ तर वेगाने होतेच, पण त्यांची पानंही हिरवीगार होतात आणि झाडांना लवकर फुलं येतात. त्याचबरोबर जमिनीचा पोतही सुधारतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की, झाडांना कधीही जास्त प्रमाणात कांद्याचं पाणी किंवा खत घालू नका. खताला वास येऊ नये म्हणून कांद्याची सालं नीट वाळवणं खूप गरजेचं आहे. ही एक पर्यावरणपूरक पद्धत आहे, जी कोणीही सहज वापरू शकतं.


