प्रथिने, चांगले फॅटी अॅसिड असणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये माशांचा समावेश होतो. डॉक्टरही चांगल्या आरोग्यासाठी मासे खाण्याचा सल्ला देतात. पण माशांची खरेदी करताना अनेकांना ते ताजे आहेत की नाही याबाबत कळत नाही. मात्र काही गोष्टी लक्षात ठेवल्यास चांगले मासे खरेदी करता येईल.
मुंबई : भारतात मासे, मच्छी खाणाऱ्या खवय्यांची मोठी संख्या आहे. चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टरही मासे खाण्याचा सल्ला देतात. माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅडिस, प्रथिने, व्हिटॅमिन्स, खनिजे अर्थात मिनिरल्स, अमिनो अॅसिड असे अनेक आरोग्यासाठी पोषक घटक असतात. केस, त्वचेसह संपूर्ण शरीरालाच, संपूर्ण आरोग्यासाठी मासे खाणं फायद्याचं ठरतं. भारतात मासे आवडीने खाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र मासे खरेदी करताना ते चांगले किंवा ताजे आहेत हे ओळखायचं कसं याची अनेकांनी माहिती नसते. अनेकदा केवळ वरुन मासा पाहूनची खरेदी केली जाते. मात्र त्यामुळे शिळे आणि निकृष्ट दर्जाचे मासे घरी आणले जातात आणि यामुळे शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानीचाच अधिक धोका ठरतो. अशात मासे खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे.

कसे ओळखाल ताजे, चांगल्या प्रतिचे मासे?
शरीरासाठी आरोग्यदायी असलेले मासे काळजीपूर्वक घ्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माशाचे कल्ले. माशाच्या कल्ल्यावरुनही त्याचा ताजेपणे किंवा गुणवत्ता ठरवता येते. ताज्या, चांगल्या दर्जाच्या माशांचे कल्ले लाल रंगाचे असतात. पण शिळ्या किंवा खराब झालेल्या माशाचे कल्ले काळसर, मातकट रंगाचे दिसतात. त्यामुळे माशाचे डोळे आणि कल्ले खरेदी करताना तपासणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
मासे विकत घेताना त्याचा विशिष्ट वास हे त्याच्या ताजेपणाचं वैशिष्ट्य ठरू शकतं. ताज्या माशांना उग्र वास नसतो. त्याला समुद्राच्या पाण्याचा नैसर्गिक वास अधिक असतो. मात्र मासा जर शिळा असेल तर त्याला अधिक उग्र वास असतो.
मासे खरेदी करताना त्याचे डोळे तपासा. जर माशाचे डोळे पारदर्शक किंवा अतिशय तजेलदार वाटत असतील तर ते ताजे असतात. मात्र डाळे काळसर पडलेले किंवा अतिशय खोल गेल्याचं जाणवत असेल तर तो मासा बराच काळ बर्फात ठेवलेला किंवा शिळा असू शकतो. तसंच डोळ्यांचा भाग चमकदार, चकाकणारा असणंही चांगला ताजा मासा म्हणून ओळखला जाऊ शकतो.
वास लपवण्यासाठी, मासे अधिक काळ ताजेतवाने दिसण्यासाठी त्याला बरेच दिवस बर्फात ठेवून टिकवलं जातं. मात्र काही गोष्टी काळजीपूर्वक तपासल्या तर फसवणूक होणं टाळण्यासह आरोग्याचीही काळजी घेतली जाईल.

