होंडा भारतीय बाजारात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी तीन नवीन मॉडेल्स आणण्याच्या तयारीत आहे. यामध्ये एलिव्हेट SUV चं फेसलिफ्ट,
गुरुग्राम : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी होंडा कंपनी आता कंबर कसत आहे. विक्री वाढवण्यासाठी आणि SUV व इलेक्ट्रिक गाड्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनी तीन नवीन मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये एलिव्हेट फेसलिफ्ट, अल्फा इलेक्ट्रिक एसयूव्ही आणि प्रेल्युड हायब्रीड कूप यांचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत या गाड्या भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
एलिव्हेट फेसलिफ्टला मिळणार नवा लुक
सध्या भारतात होंडाची एलिव्हेट ही एकमेव एसयूव्ही आहे. ही गाडी २०२३ मध्ये बाजारात आली होती. पण मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमधील वाढती स्पर्धा पाहता कंपनीने या गाडीला एक मोठे अपडेट देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन एलिव्हेटची मूळ रचना सध्याच्या मॉडेलसारखीच असेल, पण तिच्या पुढील आणि मागील डिझाइनमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. नवीन फ्रंट ग्रिल, सुधारित बंपर आणि आधुनिक लायटिंग सिस्टीममुळे गाडीला अधिक आकर्षक लुक मिळेल.
गाडीच्या इंटिरियरमध्येही अनेक बदल अपेक्षित आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या सिटी सेडानप्रमाणे यात व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्ससह अधिक प्रीमियम सुविधा मिळण्याची शक्यता आहे. फीचर्सची यादीही अधिक मोठी केली जाईल. इंजिनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. सध्याचे १.५-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनच यात कायम राहील.
अल्फा इलेक्ट्रिक एसयूव्ही: होंडाची मोठी इलेक्ट्रिक खेळी
नवीन अल्फा इलेक्ट्रिक एसयूव्ही हे भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात होंडाचे एक मोठे पाऊल असेल. कंपनीने या गाडीची देशात रोड टेस्टिंगही सुरू केली आहे. वेगवेगळ्या प्रदेशांतील आणि हवामानातील परिस्थितीमध्ये या गाडीची चाचणी सुरू आहे. ही एसयूव्ही खास इलेक्ट्रिक वाहनांसाठी विकसित केलेल्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे. बॉक्सी डिझाइन आणि फ्युचरिस्टिक स्टायलिंग हे या गाडीचे मुख्य आकर्षण आहे. गाडीमध्ये मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स, लेदरेट अपहोल्स्ट्री आणि पॅनोरॅमिक सनरूफ किंवा ग्लास रूफ यांसारख्या अनेक प्रीमियम सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
या गाडीमध्ये ६५ किलोवॅट-तास आणि ७५ किलोवॅट-तास क्षमतेचे लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी पॅक वापरले जाण्याची शक्यता आहे. एका चार्जमध्ये सुमारे ४५० ते ५०० किलोमीटरची खरी ड्रायव्हिंग रेंज देण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
प्रेल्युड हायब्रीड कूपचीही भारतात एंट्री
होंडाचे एकेकाळचे प्रसिद्ध मॉडेल 'प्रेल्युड' आता भारतीय बाजारात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. ही दोन-दरवाजी असलेली प्रीमियम स्पोर्ट्स कूप हायब्रीड तंत्रज्ञानासह सादर केली जाईल. रिपोर्ट्सनुसार, यात २.०-लिटर पेट्रोल इंजिन आणि हायब्रीड सिस्टीम असेल, जी सुमारे २०० पीएस पॉवर आणि ३१५ एनएम टॉर्क निर्माण करेल.
ही गाडी बाजारात आल्यावर भारतातील होंडाची सर्वात वेगवान आणि सर्वात महागडी गाडी ठरेल. ब्रँडची प्रीमियम इमेज अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हे एक 'हॅलो' मॉडेल असेल. त्यामुळे, होंडाच्या ग्लोबल एसयूव्ही ZR-V पेक्षा जास्त किमतीत प्रेल्युड भारतात लाँच केली जाईल, असा बाजाराचा अंदाज आहे.
या तीन मॉडेल्सद्वारे होंडा एसयूव्ही, इलेक्ट्रिक वाहन आणि प्रीमियम परफॉर्मन्स कार सेगमेंटमध्ये एकाच वेळी आपली उपस्थिती मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. बाजारातील तीव्र स्पर्धेत कंपनीच्या नवीन उत्पादन धोरणाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.


