घरच्या घरी बनवलेले कोकोपीट वापरून तुम्ही तुमच्या बागेतील झाडे अधिक निरोगी आणि डेरेदार बनवू शकता. नारळाच्या शेंड्यांपासून बनवलेले हे नैसर्गिक खत मातीचा पोत सुधारते आणि ओलावा टिकवून ठेवते. कोकोपीट कसे बनवायचे आणि त्याचे फायदे जाणून घ्या.

बागकामाची आवड असणाऱ्यांना आपली झाडे अधिक डेरेदार आणि निरोगी कशी बनवायची, हा प्रश्न नेहमी पडतो. यावर एक सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे घरच्या घरी बनवलेलं कोकोपीट. नारळाच्या शेंड्यांपासून तयार होणारं हे सेंद्रिय खत मातीचा दर्जा सुधारतं आणि झाडांची वाढ वेगाने करतं. होम गार्डनिंगसाठी हा एक उत्तम पर्याय ठरत आहे.

आपण सहसा नारळाच्या शेंड्या कचऱ्यात फेकून देतो किंवा त्यांचा वापर फक्त दोऱ्या आणि मॅट्स बनवण्यासाठी होतो असं आपल्याला वाटतं. पण याच शेंड्यांपासून कोकोपीट बनवता येतं. मातीला हा एक उत्तम आणि इको-फ्रेंडली पर्याय आहे. यामुळे झाडांच्या मुळांची चांगली वाढ होते आणि माती घट्ट होण्यासारख्या समस्या दूर होतात.

कोकोपीट नेमकं आहे तरी काय?

कोकोपीटला कॉयर पिथ, कॉयर डस्ट किंवा कोकोनट कॉयर असंही म्हणतात. नारळाच्या शेंड्यांवर प्रक्रिया करताना मिळणारा हा एक नैसर्गिक पदार्थ आहे. शेंड्यांमधून लांब धागे काढल्यानंतर जो मऊ आणि स्पंजसारखा भाग उरतो, तो गोळा करून स्वच्छ केला जातो. यापासूनच कोकोपीट तयार होतं. साध्या मातीच्या तुलनेत कोकोपीट खूप हलकं, निर्जंतुक आणि सच्छिद्र असतं.

यामुळेच बिया रुजवण्यासाठी किंवा इनडोअर आणि आउटडोअर झाडांच्या कुंडीतील मातीत मिसळण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आधुनिक बागकामात कोकोपीटचा वापर वेगाने वाढत आहे, कारण ते प्रभावी तर आहेच, शिवाय पर्यावरणासाठीही सुरक्षित आहे.

घरच्या घरी कोकोपीट कसं बनवायचं?

बाजारात मिळणाऱ्या कोकोपीटमध्ये अनेकदा भेसळ असू शकते. त्यामुळे घरच्या घरी शुद्ध कोकोपीट बनवणं कधीही चांगलं. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्वात आधी नारळाच्या स्वच्छ शेंड्या गोळा करा आणि त्या पूर्णपणे वाळलेल्या आहेत याची खात्री करा.

शेंड्या चांगल्या वाळल्यानंतर कात्री किंवा कटरच्या मदतीने त्याचे छोटे छोटे तुकडे करा. त्यानंतर हे तुकडे मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पावडर तयार करा. आता ही पावडर चाळणीने चाळून घ्या, जेणेकरून जाडसर धागे वेगळे होतील आणि तुम्हाला एकदम बारीक कोकोपीट मिळेल.

यानंतर एक महत्त्वाची स्टेप म्हणजे हे कोकोपीट पाण्याने धुणं. यामुळे त्यातील अतिरिक्त क्षार निघून जातात. तयार झालेलं कोकोपीट साधारण एक तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते पिळून त्यातील जास्तीचं पाणी काढून टाका. आता हे कोकोपीट एक दिवस कडक उन्हात वाळवा. तुमचं घरगुती कोकोपीट बागेत वापरण्यासाठी एकदम तयार आहे.

बागकामासाठी कोकोपीटचे फायदे

बागकामात कोकोपीटचा वापर केल्यास झाडे निरोगी आणि डेरेदार होण्यास खूप मदत होते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता. कोकोपीट स्वतःच्या वजनापेक्षा १० पट जास्त पाणी शोषून घेऊ शकतं. ते स्पंजसारखं काम करतं आणि झाडांच्या मुळांना हळूहळू ओलावा देतं. यामुळे झाडांना वारंवार पाणी देण्याची गरज पडत नाही. ज्यांना वेळेची कमतरता आहे किंवा जिथे पाण्याची टंचाई आहे, अशा लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

याशिवाय, कोकोपीटमुळे मातीत हवा खेळती राहते आणि पाण्याचा निचराही चांगला होतो. याच्या विशिष्ट रचनेमुळे माती घट्ट होत नाही आणि मुळांना श्वास घ्यायला जागा मिळते. यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि ती कुजण्याची शक्यता कमी होते.

कोकोपीटचा सामू (pH लेव्हल) ५.५ ते ६.८ च्या दरम्यान असतो, जो बहुतांश भाज्या आणि फुलांच्या झाडांसाठी योग्य मानला जातो. तसेच, यामध्ये रोग आणि कीड प्रतिकारक क्षमता असते, ज्यामुळे मातीतून पसरणाऱ्या आजारांपासून झाडांचं संरक्षण होतं.

कोकोपीट वजनाला हलकं असतं आणि ते पुन्हा पुन्हा वापरता येतं. त्यामुळे ते हाताळायला सोपं आणि खिशाला परवडणारं ठरतं. मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण देऊन, घरच्या घरी बनवलेलं कोकोपीट तुमच्या झाडांचं आरोग्य आणि उत्पादन नक्कीच वाढवू शकतं.