हाय हिल्स घातल्यावर तुमच्याही टाचा दुखतात का? सकाळी झोपेतून उठल्यावर जमिनीवर पाय ठेवताना भयंकर वेदना होतात? हे प्लांटर फॅसिआयटिस असू शकतं. यावर आराम मिळवण्यासाठी ५ घरगुती उपाय नक्की जाणून घ्या.
मुंबई : सणासुदीला किंवा ऑफिसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी हाय हिल्स घालणं मस्ट असतं. पण संध्याकाळपर्यंत टाचांमध्ये भयंकर वेदना सुरू होतात, साधं पाऊल टाकणंही कठीण होतं. अनेकांना तर सकाळी झोपेतून उठल्यावर जमिनीवर पाय ठेवताना सुरुवातीला असह्य वेदना होतात आणि मग हळूहळू बरं वाटतं. या समस्येला वैद्यकीय भाषेत 'प्लांटर फॅसिआयटिस' (Plantar Fasciitis) म्हणतात.
प्लांटर फॅशिया म्हणजे काय?
आपल्या पायाच्या तळव्यात 'प्लांटर फॅशिया' नावाचा एक जाड लिगामेंट असतो. तो टाचेच्या हाडापासून पायाच्या बोटांपर्यंत जोडलेला असतो. हा लिगामेंट पायाच्या कमानीला (आर्च) आधार देतो. जेव्हा या लिगामेंटवर जास्त ताण पडतो, तो दुखावतो किंवा त्याला सूज येते, तेव्हा टाचेत तीव्र वेदना होतात.
सतत हाय हिल्स घालणं, कडक सोलचे बूट वापरणं, खूप वेळ उभं राहणं, वाढलेलं वजन आणि कडक फरशीवर अनवाणी चालणं, या कारणांमुळे ही समस्या जास्त उद्भवते.
टाचेदुखी कमी करण्यासाठी ५ सोपे उपाय:
१. बर्फाचा शेक आणि बॉटल रोल:
एका पाण्याच्या बाटलीत पाणी भरून ती फ्रीजमध्ये बर्फ होण्यासाठी ठेवा. आता जमिनीवर बसा आणि पायाच्या तळव्याखाली ही बाटली ठेवून १० मिनिटे पुढे-मागे फिरवा. यामुळे बर्फाचा शेकही मिळेल आणि मसाजही होईल. सूज लवकर कमी होण्यास मदत होईल.
२. टॉवेल स्ट्रेच:
सकाळी झोपेतून उठल्यावर अंथरुणात बसूनच हा व्यायाम करा. एक लांब टॉवेल पायाच्या तळव्याला अडकवा आणि दोन्ही हातांनी आपल्याकडे ओढा. तुम्हाला पायाचा तळवा आणि पोटरीच्या स्नायूंवर ताण जाणवेल. ३० सेकंद असंच धरून ठेवा आणि ५ वेळा करा. सकाळची पहिली वेदना कमी करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
३. गरम पाणी आणि तुरटी:
रात्री झोपण्यापूर्वी एका टबमध्ये सोसवेल इतकं गरम पाणी घ्या. त्यात तुरटीचा एक खडा आणि थोडं मीठ टाका. या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून बसा. तुरटीमुळे सूज कमी होते आणि स्नायूंना आराम मिळतो.
४. चपला-बूट बदला:
सलग हाय हिल्स घालणं टाळा. सध्या बाजारात सिलिकॉन हील पॅड किंवा आर्च सपोर्ट मिळतात, ते बुटांमध्ये वापरा. घरात कधीही कडक फरशीवर अनवाणी चालू नका, नेहमी मऊ स्लिपर वापरा.
५. काफ स्ट्रेचिंग (पोटरीचा व्यायाम):
भिंतीकडे तोंड करून उभे राहा. एक पाय मागे घेऊन सरळ ठेवा आणि पुढचा पाय गुडघ्यात थोडा वाकवा. मागच्या पायाची टाच जमिनीवर घट्ट टेकवून ठेवा. ३० सेकंद या स्थितीत राहा. यामुळे प्लांटर फॅशियावरचा ताण कमी होतो.
डॉक्टरांकडे कधी जावं?
जर या उपायांनी १ आठवड्यातही वेदना कमी झाल्या नाहीत, टाचेला सूज आली, ताप आला किंवा पाय जमिनीवर ठेवणंच शक्य नसेल, तर अजिबात दुर्लक्ष करू नका. तातडीने ऑर्थोपेडिक (हाडांच्या) डॉक्टरांचा सल्ला घ्या. सणासुदीच्या काळात पाय निरोगी ठेवण्यासाठी आतापासूनच काळजी घ्या.
आणखी बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप चॅनेलला फॉलो करा, इथे क्लिक करा.









