- Home
- lifestyle
- Microplastics Health Risks : रक्तात मिसळतायत मायक्रोप्लास्टिक्स, मानवी आरोग्याला मोठा धोका
Microplastics Health Risks : रक्तात मिसळतायत मायक्रोप्लास्टिक्स, मानवी आरोग्याला मोठा धोका
आपण पित असलेलं पाणी आणि अन्नातून मायक्रोप्लास्टिक्सचे कण शरीरात जातात. हे कण पाण्याशी संपर्क आल्यावर धोकादायक रासायनिक प्रक्रिया करतात आणि आपल्या शरीरातील पेशींना गंभीर नुकसान पोहोचवतात.

मानवी शरीरात घुसतायत मायक्रोप्लास्टिक्स
आपण पित असलेलं पाणी, अन्न आणि आजूबाजूच्या वातावरणात मायक्रोप्लास्टिक्स (सूक्ष्म प्लास्टिक) सगळीकडे पसरलेत. हे प्लास्टिकचे कण शरीरात गेल्यावर नुसते बाहेर पडत नाहीत, तर ते शरीरात धोकादायक रासायनिक प्रक्रिया करतात, असं शास्त्रज्ञांनी आता शोधून काढलंय.
कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी (बर्कले) च्या शास्त्रज्ञांनी केलेला हा नवा अभ्यास प्रसिद्ध 'नेचर' (Nature) मासिकात छापून आलाय. प्लास्टिक रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय असतं, या जुन्या समजुतीला या अभ्यासाने मोठा धक्का दिलाय.

पाण्याशी संपर्क आल्यावर धोका वाढतो
फूड पॅकेजिंग आणि पाण्याच्या बाटल्यांमध्ये प्लास्टिकचा वापर जास्त होतो कारण ते रासायनिक दृष्ट्या स्थिर असतं. पण जेव्हा मोठ्या प्लास्टिकचे तुकडे होऊन मायक्रोप्लास्टिक्स आणि त्याहूनही लहान नॅनोप्लास्टिक्स बनतात, तेव्हा त्यांचा आकार कमी होऊन पृष्ठभाग वाढतो.
यामुळे हे कण पाण्याशी जास्त संपर्क साधतात आणि रासायनिक प्रक्रियांना सुरुवात होते. "इथे पाणी फक्त बघ्याची भूमिका घेत नाही, तर ते रासायनिक प्रक्रियांना चालना देतं," असं कोलंबिया युनिव्हर्सिटीचे रसायनशास्त्र आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक वेई मिन (Wei Min) यांनी सांगितलं.
पेशी नष्ट करणारे धोकादायक रेणू
प्लास्टिकचा पृष्ठभाग आणि पाणी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा 'रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज' (Reactive Oxygen Species) नावाचे अत्यंत जहाल रेणू तयार होतात. हे रेणू जास्त प्रमाणात तयार झाल्यावर मानवी शरीरातील पेशी आणि उती (tissues) नष्ट करू लागतात.
मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याने हा शोध अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मायक्रोप्लास्टिक्स जेव्हा आपल्या रक्तात किंवा पेशींमध्ये शिरतात, तेव्हा ते तिथे सतत रासायनिक प्रक्रिया करत राहण्याचा मोठा धोका असतो.
मानवी आरोग्याला मोठा धोका?
अन्न आणि पिण्याच्या पाण्यात मायक्रोप्लास्टिक्स सापडल्याने जगभरात चिंता वाढली आहे. २०२४ मध्ये प्राध्यापक मिन यांच्या टीमने केलेल्या अभ्यासात असं समोर आलं की, एका लिटर बाटलीबंद पाण्यात सरासरी २,४०,००० सूक्ष्म प्लास्टिकचे कण असतात, ज्यात बहुतांश नॅनोप्लास्टिक्स असतात.
मायक्रोप्लास्टिक्स आणि हृदयविकारासारख्या आजारांचा काय संबंध आहे, यावर शास्त्रज्ञ आधीपासूनच अभ्यास करत आहेत. पण हे नुकसान नेमकं कसं होतं, हे आतापर्यंत स्पष्ट नव्हतं. या नव्या अभ्यासाने पाण्यासोबतच्या प्रक्रियेतून तयार होणाऱ्या घातक रेणूंकडे लक्ष वेधून याचं उत्तर दिलंय.
भविष्यासाठी काय आहे उपाय?
या अभ्यासाच्या मदतीने शास्त्रज्ञ आता असं नवीन प्लास्टिक बनवू शकतील जे मानवी शरीराला नुकसान पोहोचवणार नाही किंवा अशा रासायनिक प्रक्रिया करणार नाही. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका तेरेसा हेड-गॉर्डन (Teresa Head-Gordon) म्हणाल्या, "सध्या वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा धोका कमी करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी इंजिनिअर्सना या संशोधनाची मोठी मदत होईल."
मायक्रोप्लास्टिक्सच्या मानवी आरोग्यावरील परिणामांवर अजून संशोधन होणं गरजेचं असलं, तरी या अभ्यासाने विज्ञान जगताला एक नवी दिशा नक्कीच दाखवली आहे.







