सार
चैत्र नवरात्रीसह हिंदू नववर्षाची सुरुवात होते. याच दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. येत्या 30 मार्चला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच गुढीपाडव्याची पौराणिक कथा जाणून घेऊया.
Gudi Padwa 2025 Story : हिंदू नवं वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातील शुल्क पक्षाची प्रतिपदा तिथी म्हणजेच चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी होते. हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत खास मानला जातो. कारण या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवा आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करतात. यादिवशी घराबाहेर गुढी उभारली जाते. याला विजयाचे प्रतीक मानले जाते. गुढीचा अर्थ असा होतो की, विजयाचा पताका. गुढीपाडव्याला गुढी उभारल्यास घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. पण गुढीपाडवा का साजरा करतात हे माहितेय का?
गुढीपाडव्याची पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, त्रेता युगात दक्षिण भारतात बळी नावाच्या राजाचे शासन होते. ज्यावेळी भगवान राम माता सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी लंकेत जात होते तेव्हा दक्षिण भारतात त्यांची भेट राजा बळीचा लहान भाऊ सुग्रीव याच्यासोबत झाली. सुग्रीवने भगवान राम यांना बळी कशाप्रकारे हैदोस घालतोय हे सांगितले आणि मदत मागितली. सुग्रीवाचे संपूर्ण ऐकून घेतल्यानंतर श्रीरामांनी त्याला मदत करण्याचे ठरविले. यानंतर बळीचा वध करण्यात आला. असे म्हटले जाते की, ज्या दिवशी श्रीरामांनी बळीचा वध केला त्याच दिवशी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा होती. यामुळे दक्षिण भारतात प्रत्येक वर्षी या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो.
गुढीपाडव्यासंदर्भात अन्य मान्यता
काही प्रचलित कथांनुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीवेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी काही घुसखोरांचा पराभव केला होता. यानंतर मावळ्यांनी आनंद साजरा करत विजयाचा पताका फडकावला. याच दिवसाला गुढीपाडव्याच्या रुपात साजरा करण्यास सुरुवात झाली.
आणखी एका पौराणिक कथेनुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेवेळी ब्रम्हांनी सृष्टीची निर्मिती केली. यामुळे गुढीपाडवा आणि हिंदू नवं वर्ष साजरे केले जाते. म्हणून गुढीपाडव्याला ब्रम्हांची पूजा करण्याला विशेष महत्व आहे.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)