जपानमध्ये लोक एकमेकांचे स्वागत करताना, आभार मानताना आणि अभिवादन करताना आदराने वाकतात. इतरांबद्दल मनापासून आदर असणारी माणसंच खऱ्या अर्थाने मोठी असतात, असं लाईफस्टाईल कोच ल्यूक कौटिन्हो यांनी म्हटलंय.

मुंबई : आरोग्य आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी प्रसिद्ध लाईफस्टाईल कोच ल्यूक कौटिन्हो (Luke Coutinho) यांनी नुकताच पाच दिवसांचा जपान दौरा केला. या दौऱ्याने त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. जपानी संस्कृतीतून प्रेरणा देणारे चार महत्त्वाचे शब्द आणि त्यातून मिळणारी शिकवण त्यांनी एक्स (ट्विटर) वर शेअर केली आहे.

युटोरी (Yutori) – आयुष्यात थोडी उसंत घ्या

आजकाल लोक मीटिंग्ज, फोन कॉल्स, वर्कआउट्स, पॉडकास्ट आणि कामाच्या मागे सतत धावत असतात. पण शरीराला खऱ्या अर्थाने शांततेतच आराम मिळतो. मनाला थोडी मोकळीक दिली की विचार अधिक स्पष्ट होतात. पण दुर्दैवाने, लोक शांतपणे श्वास घ्यायलाही विसरले आहेत.

रेई (Rei) – आदर

जपानमध्ये लोक एकमेकांचे स्वागत करताना, आभार मानताना आणि अभिवादन करताना आदराने वाकतात. ल्यूक यांच्या मते, त्यांनी पाहिलेली सर्वात उत्तम व्यक्तिमत्त्वे तीच आहेत जी इतरांचा मनापासून आदर करतात. दुसऱ्यांचा आदर केल्याने आपण लहान होत नाही, तर आपली उंची अधिक वाढते.

Scroll to load tweet…

पिन पिन कोरोरी (Pin Pin Korori) – चांगलं आयुष्य

फक्त जास्त काळ जगण्यापेक्षा, जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत स्वतःची कामं स्वतः करण्याइतपत सक्षम असणं जास्त महत्त्वाचं आहे. आरोग्याशिवाय नुसतं दीर्घायुष्य मिळवण्यात काहीच अर्थ नाही. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणं, हेच खरं ध्येय असायला हवं.

इसोगाबा मावारे (Isogaba Maware) – संथ पण योग्य मार्ग

प्रत्येक गोष्ट घाईघाईत पूर्ण करण्याचं आजकाल लोकांना वेड लागलंय. पण आपलं शरीर घाईवर नाही, तर सातत्यावर (consistency) काम करतं. संथ पण योग्य दिशेने जाणारा मार्गच नेहमी यशस्वी ठरतो.

पाच दिवसांच्या या जपान दौऱ्याने आपल्याला फक्त आरोग्याबद्दलच शिकवलं नाही, तर आपण रोज ज्या पद्धतीने जगतो, तेच आपलं सर्वात मोठं औषध आहे, याची जाणीव करून दिली, असं ल्यूक कौटिन्हो यांनी शेवटी सांगितलं.