जेवणानंतर लगेच फळं खाल्ल्याने खरंच अपचन, गॅस आणि पोट फुगण्यासारख्या समस्या होतात का? याबद्दल अनेक गैरसमज आहेत, पण खरं काय आहे ते जाणून घेऊया.
मुंबई : आपल्याकडे अनेक घरांमध्ये जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची सवय असते. अनेकजण मिठाईऐवजी आंबा, सफरचंद किंवा पपईसारखी फळं खाणं पसंत करतात. पण जेवणानंतर लगेच फळं खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे की वाईट? यामुळे खरंच गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याची समस्या होते का? चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पोट जास्त वेळ भरलेलं राहतं
रिकाम्या पोटी फळं खाल्ल्यास त्यातील साखर लवकर पचते आणि थेट लहान आतड्यात पोहोचते. पण जेवणानंतर लगेच फळं खाल्ल्यास, जेवणातील फायबर, प्रोटीन आणि फॅट्समुळे ही प्रक्रिया हळू होते. यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं आणि सारखी भूक लागून काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते.
रक्तातील साखरेवर नियंत्रण
ज्यांना टाइप 2 मधुमेह किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास आहे, त्यांच्यासाठी जेवणानंतर फळं खाणं फायदेशीर ठरू शकतं. प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असलेल्या जेवणासोबत फळं खाल्ल्यास रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढत नाही. फळांमधील फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
संवेदनशील पोट असलेल्यांना पोट फुगण्याचा धोका
कलिंगड, पेअर आणि द्राक्षं यांसारख्या फळांमध्ये फ्रुक्टोजचं (फळांमधील नैसर्गिक साखर) प्रमाण जास्त असतं. ज्यांची पचनसंस्था संवेदनशील आहे, त्यांनी ही फळं जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्यांना अस्वस्थ वाटू शकतं. यामुळे तात्पुरता गॅस किंवा पोट फुगल्यासारखं होऊ शकतं.
मग काय करायचं?
सर्वसाधारणपणे, निरोगी व्यक्तींसाठी जेवणानंतर फळं खाणं पूर्णपणे सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे. बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम गोड पदार्थांपेक्षा नैसर्गिक फळं खाणं केव्हाही चांगलंच!


