दिवाळीच्या धावपळीत, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या सेलिब्रेशनमुळे खूप थकवा येऊ शकतो. सणांच्या दिवसांत नॅचरली फ्रेश आणि एनर्जीने भरलेलं राहण्यासाठी या सोप्या आयुर्वेदिक टिप्स नक्की ट्राय करा.
दिवाळी म्हणजे आनंद, रोषणाई, फॅमिली गेट-टुगेदर आणि फराळाची मेजवानी. पण रात्री उशिरापर्यंत चालणारं सेलिब्रेशन, जेवणाच्या अनियमित वेळा, खूप जास्त गोड खाणं, अपुरी झोप आणि धावपळ यामुळे अनेकांना खूप थकवा जाणवतो. सणांच्या या दिवसांत एनर्जी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही सोपे उपाय सांगितले आहेत.
आयुर्वेदानुसार, आपलं आरोग्य हे दोष, अग्नी (पचनशक्ती) आणि धातू यांच्या बॅलन्सवर अवलंबून असतं. यासोबतच रोजचं रुटीनही महत्त्वाचं असतं. जेवणाच्या चुकीच्या वेळा आणि अपुऱ्या झोपेमुळे पचनावर परिणाम होतो आणि शरीरात जडपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
१. जेवणाच्या वेळा पाळा
सणांच्या गडबडीत अनेकदा लोक जेवण टाळतात आणि नंतर एकदम खूप जास्त जेवतात. भूक आणि पचनशक्तीनुसार जेवण करावं, असं आयुर्वेद सांगतं. जेवणाच्या वेळा शक्यतो पाळा, गरजेपेक्षा जास्त खाणं टाळा. ताजं, गरम आणि पचायला हलकं असेल असंच अन्न खाण्याचा प्रयत्न करा.
२. भरपूर पाणी प्या
शॉपिंग, प्रवास आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी यात लोक अनेकदा पाणी प्यायला विसरतात. दिवसभर शरीरात पुरेसं पाणी जाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि प्रकृतीनुसार कोमट पाणी किंवा हर्बल चहा घेऊ शकता.
३. झोपेशी तडजोड नको
रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांमुळे शरीराचं नॅचरल स्लीप सायकल बिघडतं. आयुर्वेदात निद्रा (झोप) हा आरोग्याचा एक महत्त्वाचा पाया मानला गेला आहे. झोपण्याची वेळ फिक्स ठेवली आणि पुरेशी विश्रांती घेतली, तर थकवा कमी होतो आणि दिवसभर फ्रेश वाटतं.
४. हलका व्यायाम करा
सणांच्या धावपळीतही चालणं, हलकी योगासने आणि स्ट्रेचिंग केल्याने शरीर ॲक्टिव्ह राहतं. सकाळी थोडा वेळ चालल्याने मन आणि शरीर दोन्ही फ्रेश होतं. पण जर आधीच खूप थकवा आला असेल, तर जास्त व्यायाम करणं टाळा.
५. खाण्यावर कंट्रोल आणि रिलॅक्सेशन
सणांचे पारंपारिक पदार्थ पूर्णपणे टाळण्यापेक्षा ते प्रमाणात खा. भूक किती आहे आणि पोट भरलंय का, याकडे लक्ष द्या. कामाच्या मध्ये छोटे ब्रेक घेणं, दीर्घ श्वास घेणं आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवणं यामुळे मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.
६. रोजचं रुटीन बॅलन्स ठेवा
दिनचर्या या आयुर्वेदिक संकल्पनेत रोजच्या सवयींचं महत्त्व सांगितलं आहे. वेळेवर जेवण, पुरेशी झोप, वैयक्तिक स्वच्छता आणि योग्य व्यायाम यामुळे विनाकारण येणारा थकवा टाळता येतो.
निष्कर्ष
सण हे आनंदासाठी असतात, थकव्यासाठी नाही. आयुर्वेदाचे हे सोपे नियम पाळून आणि लाइफस्टाईलमध्ये थोडे बदल करून आपण आपली एनर्जी आणि पचनशक्ती चांगली ठेवू शकतो. दिवाळीचा खरा आनंद फक्त घर उजळण्यात नाही, तर आपलं आरोग्य जपण्यातही आहे.
-हा लेख डॉ. सिमी सी.पी., सहयोगी प्राध्यापक, रचना शरीर विभाग, एसडीएम कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड हॉस्पिटल, हसन यांनी लिहिला आहे.












