Green Chilli Benefits: हिरवी मिरची खाल्ली की पित्त किंवा ॲसिडिटी होते असा अनेकांचा समज असतो. पण योग्य प्रमाणात हिरवी मिरची खाल्ली तर वजन कमी करण्यापासून ते पचन सुधारण्यापर्यंत शरीराला अनेक भारी फायदे मिळतात.

मुंबई : अनेक लोकांना वाटतं की हिरवी मिरची खाल्ल्याने तब्येतीला त्रास होतो. ती खाल्ल्यामुळे पोटात जळजळ, गॅस आणि ॲसिडिटीची समस्या होते असं लोक मानतात. पण तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही योग्य प्रमाणात हिरवी मिरची खाल्ली, तर शरीराला जबरदस्त फायदे होतात. हिरवी मिरची खाल्ल्याने नक्की काय फायदे होतात, याबद्दल डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

वजन कमी करण्यासाठी आणि मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी मदत:

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सॅसिन (Capsaicin) नावाचा घटक असतो. हा घटक शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढवायला मदत करतो. याशिवाय, शरीरातील अतिरिक्त कॅलरीज जाळण्याच्या प्रक्रियेलाही यामुळे गती मिळते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हिरवी मिरची खूप उपयोगी ठरते.

पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर:

हिरव्या मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर असतं. हे फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवायला मदत करतं. त्यामुळे बद्धकोष्ठाचा (Constipation) त्रास कमी होतो आणि अन्नातील पोषक तत्वं शरीरात व्यवस्थित शोषून घेतली जातात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते:

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं. यामुळे सर्दी, खोकला आणि इतर इन्फेक्शनपासून शरीराचा बचाव होतो. व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी हिरवी मिरची हा एक उत्तम पर्याय आहे.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते:

हिरव्या मिरचीतील काही घटक रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनच्या कामावर सकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेले लोक आपल्या रोजच्या आहारात योग्य प्रमाणात हिरवी मिरची समाविष्ट करू शकतात.

हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम:

हिरव्या मिरचीतील कॅप्सॅसिन आणि इतर सक्रिय घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करायला आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले ठेवायला मदत करतात. याशिवाय, रक्ताच्या गाठी होण्याचा धोका कमी करण्याबाबतही अभ्यास सुरू आहेत. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.