Curse Village : सणाचा शाप... दिवाळीत अंधारात राहणारे देशातील एकमेव गाव!
Curse Village: दिवाळीत पूर्ण देश दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघतो, पण आपल्या देशात असं एक गाव आहे जिथे एकही दिवा लावला जात नाही. हे गाव दिवाळीच्या रात्री पूर्णपणे अंधारात असतं. यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?

दिवाळीचा शाप असलेले गाव
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाश यावा, या उद्देशाने आपण हा सण साजरा करतो. पण, याच सणाच्या दिवशी आपल्या देशातलं एक गाव मात्र पूर्णपणे अंधारात बुडून जातं. गेल्या १०० वर्षांत या गावात दिवाळीत एकही दिवा लागलेला नाही. एका शापामुळे हे गाव असं राहिलं आहे. हे गाव नेमकं कुठे आहे आणि त्याला कोणता शाप आहे?
हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सम्मू या गावात गेल्या १०० वर्षांपासून कुणीही दिवाळी साजरी केलेली नाही. यामागे एक भयंकर शाप असल्याचं ग्रामस्थ सांगतात.

या गावाला कोणता शाप आहे?
या गावाला एक भयंकर शाप असल्यामुळे दिवाळी साजरी केली जात नाही, असं ग्रामस्थ सांगतात. 'ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रथा आहे. पूर्वी या गावातील एका महिलेचा नवरा वारल्यामुळे ती सती गेली होती. त्यावेळी तिने शाप दिला होता की या गावात यापुढे कधीही दिवाळी साजरी होणार नाही. त्या दिवसापासून आजपर्यंत लोक या शापाच्या भीतीने जगतात,' असं गावकरी सांगतात.
सण साजरा केला तर काय होतं?
कुणी चुकूनही या गावात दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला, तर अनपेक्षित संकटे येतात असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. अनेकांनी तसा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी काहीतरी भयंकर अपघात घडला. आग लागणे, अचानक आर्थिक नुकसान, जीवितहानी किंवा अकाली मृत्यू अशा घटना घडतात असं ग्रामस्थांनी सांगितलं.
इथे दिवाळी साजरी न करणे म्हणजे फक्त फटाके न फोडणे असं नाही, तर कुठल्याही घरात एकही दिवा लावला जात नाही. सणासाठी कोणतेही गोडधोड पदार्थ केले जात नाहीत. यातलं काहीही केलं तरी गावात जीव जातो, असा समज आहे. म्हणूनच हा सण हे गाव पूर्ण अंधारात घालवतं.
शाप दूर करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरलेत का?
या भयंकर प्रथेचा आणि शापाचा प्रभाव दूर करण्यासाठी स्थानिकांनी अनेक पूजा, उपाय आणि विधी केले, पण शापाचा प्रभाव कमी झाला नाही. सण आला की अपघात होतील या भीतीने अनेकजण दिवसभर घरातच बसून राहतात.
'मनात दिवाळी साजरी करण्याची इच्छा असते. पण गावाच्या परिस्थितीमुळे काही करता येत नाही. सजावट, प्रकाश काहीच नसतं. शंभर वर्षे उलटली तरी हा शाप आमचा पिच्छा सोडत नाही. जग सणाच्या प्रकाशात उजळत असताना आमचं गाव अंधारात असतं. दुसऱ्या गावांत लोक किती आनंदात दिवाळी साजरी करतात, हे पाहण्यासाठी आम्हाला शेजारच्या गावांत जावं लागतं,' अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली.

