Potato Papad : घरच्याघरी तयार करा बटाट्याचे कुरकुरीत पापड, वाचा सोपी रेसिपी
Potato Papad: बटाट्यापासून तुम्ही चिप्सप्रमाणेच पापडही बनवू शकता. वरण-भात किंवा सांबारसोबत हे पापड खूप छान लागतात. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे पापड कसे बनवायचे, याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

बटाट्याचे पापड
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बटाट्याचे पापड खूप आवडतात. बाजारात हे पापड सहसा मिळत नाहीत. पण तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे पापड बनवू शकता. याची रेसिपी खूपच सोपी आहे.

साहित्य
मोठे बटाटे – ३
चिली फ्लेक्स (कुटलेली लाल मिरची) – २ चमचे
तेल – १ चमचा
मीठ – चवीनुसार
कृती
१. कुकर किंवा पातेल्यात बटाटे मऊ शिजेपर्यंत उकडून घ्या. थंड झाल्यावर त्यांची साले काढा.
२. एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे घ्या आणि हाताने गुठळ्या राहणार नाहीत असे चांगले कुस्करून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा तेल घालून पिठासारखा गोळा मळून घ्या.
३. एका प्लास्टिकच्या कागदाला थोडे तेल लावा. पिठाचा छोटा गोळा घेऊन कागदावर ठेवा आणि बोटांनी गोल, पातळ पापड थापून घ्या.
४. तयार झालेले पापड एका सुती साडीवर किंवा मोठ्या ताटात रांगेत वाळत घाला. कडक उन्हात दोन दिवस हे पापड चांगले वाळवून घ्या.
५. पापड पूर्णपणे वाळल्यानंतर ते एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
६. जेव्हा खावेसे वाटतील, तेव्हा गरम तेलात तळून घ्या. तुमचे कुरकुरीत आणि चविष्ट पापड तयार आहेत.

