Weight Loss Tips : चिया सीड्स आणि सब्जा, दोन्हीपैकी वजन कमी करण्यासाठी बेस्ट काय?
Chia Seeds Vs Sabja Seeds : चिया सीड्स आणि सब्जा हे दोन्ही दिसायला अगदी सारखेच असतात. पण या दोन्हीमध्ये नक्की फरक काय आहे? आणि वजन कमी करण्यासाठी यापैकी कोणतं जास्त फायदेशीर ठरतं?

चिया सीड्स आणि सब्जा
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही जिम आणि डाएटच्या मागे लागला आहात का? सकाळी उपाशीपोटी चिया सीड्स प्यायचे की सब्जा, यात कन्फ्युज आहात? दिसायला जवळपास सारखेच असलेले हे दोन्ही सीड्स शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. वजन कमी करण्यासाठी आणि विशेषतः पोटाची चरबी घटवण्यासाठी यापैकी 'सुपर फूड' कोणतं, ते आता पाहूया...
सब्जा आणि चिया सीड्स काम कसं करतात?
चिया सीड्स असो वा सब्जा, ते थेट शरीरातील चरबी जाळत नाहीत. पण भूक नियंत्रित करून आणि पचनक्रिया सुधारून ते वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात. मात्र, ते काम करण्याचा वेग आणि पद्धत यात महत्त्वाचा फरक आहे.

चिया सीड्स
चिया सीड्समध्ये विरघळणारे फायबर, ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि प्लांट-बेस्ड प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. हे पाण्यात भिजवल्यावर जेलसारखं होतं, ज्यामुळे पचनक्रिया संथ होते. परिणामी जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि आपण विनाकारण खात नाही. यासोबतच योग्य डाएट आणि व्यायाम केल्यास वजन लवकर कमी होतं.
सब्जा
तुळशीच्या कुळातील सब्जामध्ये ३० टक्क्यांहून अधिक डायटरी फायबर असतं. ते पाण्यात टाकल्यावर खूप लवकर फुलतात.
पोट फुगणे कमी करतात: अनेकजण पोट फुगणे आणि गॅसला पोटाची चरबी समजण्याची चूक करतात. जेवणानंतर होणारी ऍसिडिटी, पोट फुगणे, जड वाटणे यांसारख्या समस्या सब्जामुळे प्रभावीपणे कमी होतात.
कसे काम करतात?: हे खूप वेगाने काम करतात आणि भूक लगेच नियंत्रित करतात. यामुळे जास्त खाणे कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.
दोन्हीपैकी बेस्ट काय?
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, पोटाची चरबी घटवायची असेल आणि मेटाबॉलिझम वाढवायचा असेल, तर चिया सीड्स निवडा. पण जर तुम्हाला ऍसिडिटी, पोट फुगणे किंवा जास्त भूक लागण्याची समस्या असेल, तर सब्जा घेणं जास्त फायदेशीर ठरेल. आहारतज्ज्ञांच्या मते, यापैकी फक्त एकच घेण्यापेक्षा, दिवसाआड दोन्ही डाएटमध्ये समाविष्ट केल्यास जास्त फायदा मिळतो.
चांगल्या परिणामांसाठी कसं घ्यावं?
कुठलेही सीड्स खाण्यापूर्वी किमान १ ते २ चमचे पाण्यात चांगले भिजवून घ्यावेत (कधीही कोरडे खाऊ नये).
भिजवलेले सीड्स लिंबूपाणी, स्मूदी किंवा दह्यासोबत घेऊ शकता.
हे जेवणाला पर्याय म्हणून नाही, तर संतुलित आहाराचा एक भाग म्हणून घेतले पाहिजेत.
