Healthy Skin : चमकदार त्वचेसाठी कोणतीही क्रीम नको, आहारात करा या 5 भाज्यांचा समावेश
Healthy Skin : ऊन, धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याची चमक नाहीशी होते. पण त्वचा चमकदार बनवण्यासाठी कोणत्याही महागड्या क्रीमची गरज नाही. तुमच्या रोजच्या जेवणात या ५ भाज्यांचा समावेश नक्की करा.

चेहऱ्याची चमक वाढवणाऱ्या ५ भाज्या
उन्हात फिरणे, वाहनांचा धूर, प्रदूषण, हवामानातील बदल आणि जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे त्वचेची चमक कमी होते. चेहऱ्यावर मुरुम, टॅनिंग आणि ऑयली स्किनची समस्या वाढते. अनेक जण महागड्या क्रीम्सवर पैसे खर्च करतात, पण त्याचा परिणाम फक्त काही तासांपुरता असतो. कायमस्वरूपी ग्लो हवा असेल, तर शरीराला आतून पोषण मिळणे गरजेचे आहे. शरीराला योग्य पोषण मिळाले, तरच त्वचा नैसर्गिकरीत्या चमकते.

सौंदर्य वाढवणाऱ्या ५ भाज्या
हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी क्रीम लावण्याऐवजी तुमच्या डाएटमध्ये बदल करा. रोजच्या जेवणात फक्त वरण-भात खाण्याऐवजी काही विशिष्ट भाज्यांचा समावेश करा. या भाज्यांमध्ये त्वचेसाठी फायदेशीर असणारी जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तुम्ही या भाज्या नियमितपणे खाल्ल्यास तुमच्या त्वचेला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि त्वचा पुन्हा निरोगी व चमकदार बनते. या ५ भाज्या कोणत्या आहेत?
गाजर
गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. आपण गाजर खाल्ल्यावर आपले शरीर त्याचे रूपांतर ‘व्हिटॅमिन ए’ मध्ये करते. त्वचेच्या पेशींची वाढ आणि त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ‘व्हिटॅमिन ए’ खूप आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात गाजराचा समावेश नक्की करा. तुम्ही सॅलड, भाजी, सूप किंवा अगदी कच्चे गाजरही खाऊ शकता.
बटाटा
बटाटा खाण्याबद्दल अनेकांचे गैरसमज आहेत. बटाट्यामुळे शरीराला फायदा होत नाही असे काहींना वाटते. पण बटाट्याचे नियमित सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी बटाटा हा एक उत्तम घरगुती उपाय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही कापसाच्या मदतीने बटाट्याचा रस चेहऱ्याला लावू शकता किंवा त्याचे काप डोळ्यांवर ठेवू शकता. काही जण बटाट्याचा रस तांदळाचे पीठ आणि कोरफड जेलमध्ये मिसळून फेस पॅक बनवतात. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतात आणि त्वचा चमकदार होते.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ आणि ‘लायकोपीन’ मुबलक प्रमाणात असते. लायकोपीन आपल्या शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवते. उन्हामुळे त्वचेचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी लायकोपीन खूप महत्त्वाचे असल्याचे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे आहारात टोमॅटोचा नक्की समावेश करा. तुम्ही सूप, भाजी किंवा सॅलडच्या स्वरूपात टोमॅटो खाऊ शकता. अनेक जण टोमॅटोचा गर फेसपॅक म्हणूनही चेहऱ्यावर लावतात.
काकडी
काकडीत पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे काकडी खाल्ल्यावर शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि त्वचा निरोगी राहते. उन्हातून घरी आल्यावर थंड काकडीचे काप करून नक्की खा. तसेच रोजच्या जेवणात काकडीचा समावेश करा. नियमित काकडी खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. उन्हातून दमून आल्यावर डोळ्यांवर थंड काकडीचे काप ठेवल्याने डोळ्यांची सूज तात्पुरती कमी होण्यास नक्कीच मदत होते.
बीटरूट
बीटरूट त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. रोजच्या आहारात बीटरूट घेतल्यास तुमच्या त्वचेला आवश्यक पोषण मिळते. तसेच शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत होते. तुम्ही बीटरूटची भाजी, सॅलड किंवा ज्यूसच्या स्वरूपात सेवन करू शकता.
काळजी घ्या:
फक्त भाज्या खाल्ल्याने किंवा फेसपॅक लावल्याने त्वचेच्या सर्व समस्या सुटत नाहीत. पण स्वच्छ आहार (Clean Diet) घेतल्याने त्वचेचे आरोग्य नक्की सुधारते. तुम्ही भाज्यांचा फेसपॅक पहिल्यांदाच चेहऱ्याला लावत असाल, तर पॅच टेस्ट नक्की करा. उन्हात बाहेर जाताना SPF 30 किंवा त्याहून अधिक क्षमतेचे सनस्क्रीन आवर्जून वापरा. तुमच्या शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्या. भाज्यांसोबत फळे, सुकामेवा आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या, कारण हे सर्व तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले आहे.

