- Home
- lifestyle
- Diwali Home Offers : स्वतःचं घर घेताय? बाजारात 6 लाखांहून अधिक घरे पडून; या दिवाळीत घर खरेदीची सुवर्णसंधी
Diwali Home Offers : स्वतःचं घर घेताय? बाजारात 6 लाखांहून अधिक घरे पडून; या दिवाळीत घर खरेदीची सुवर्णसंधी
सध्या देशात न विकल्या गेलेल्या घरांची संख्या झपाट्याने वाढतेय. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिअल इस्टेट कंपन्या मोठ्या सवलती आणि ऑफर्स देण्याच्या तयारीत आहेत.

स्वतःचं घर घेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे का?
भारतात सणासुदीचा काळ सुरू झाला की बाजारपेठेत उत्साह पाहायला मिळतो. यंदाची दिवाळी रिअल इस्टेट क्षेत्रासाठीही अशीच खास असणार आहे. विशेषतः जे लोक स्वतःचं नवीन घर घेण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी या सणासुदीच्या काळात बंपर डिस्काउंटसह घर खरेदी करण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे.

रिअल इस्टेट मार्केटची सध्याची स्थिती
सध्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. बाजारात जेवढी घरे विकली जात आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने नवीन घरे बांधून तयार होत आहेत. यामुळे लाखो घरे न विकता तशीच पडून आहेत. परिणामी, नवीन प्रोजेक्ट्सचे कामही संथ गतीने सुरू आहे. हीच पडून असलेली घरे लवकरात लवकर विकण्यासाठी बिल्डर्सनी या दिवाळीत कंबर कसली आहे.
न विकल्या गेलेल्या घरांचा आकडा वाढला
चेन्नई, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादसारख्या देशातील प्रमुख मेट्रो शहरांमध्ये न विकल्या गेलेल्या घरांची संख्या सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस १२ टक्क्यांनी वाढून ६.३१ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा ५.६२ लाख इतका होता. सप्टेंबर तिमाहीत नवीन घरांच्या विक्रीत फक्त ३ टक्क्यांची वाढ (१,००,२२० घरे) झाली, तर नवीन घरांच्या लाँचिंगमध्ये १८ टक्क्यांची वाढ (१.१४ लाख घरे) झाली. यामुळेच रिकाम्या घरांचा आकडा खूप वाढला आहे.
घरांची विक्री का मंदावली?
घरांची विक्री कमी होण्यामागे मुख्य कारण म्हणजे वाढलेल्या किमती. उदाहरणार्थ, बंगळुरूमध्ये २ वर्षांपूर्वी २ बीएचके (2 BHK) घर ४० ते ७५ लाखांना मिळायचं, तेच आता १ कोटींच्या पुढे गेलंय. चेन्नई, मुंबई आणि हैदराबादमध्येही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी घर घेण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. शिवाय, गेल्या २-३ वर्षांत बिल्डर्स फक्त 'प्रीमियम' घरांवर फोकस करत आहेत, ज्यामुळे मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय लोकांसाठी घर घेणं कठीण झालंय. यासोबतच, मेट्रो शहरांमध्ये घर घेणारा मोठा वर्ग आयटी (IT) क्षेत्रात काम करतो. पण तिथे सुरू असलेली नोकरकपात आणि अस्थिरतेमुळे रिअल इस्टेटला मोठा फटका बसला आहे.
घर खरेदीसाठी हीच योग्य वेळ का?
न विकल्या गेलेल्या घरांची संख्या सतत वाढत असल्याने, रिअल इस्टेट कंपन्या या दिवाळीत ग्राहकांना मोठ्या सवलती आणि ऑफर्स देऊन घरे विकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःचं घर घेण्याचा विचार करत असाल, तर या संधीचा नक्की फायदा घ्या. तसेच, भविष्यात रेपो रेट वाढल्यास बँका गृहकर्जाचे (Home Loan) व्याजदर वाढवू शकतात, ही गोष्टही घर घेताना नक्की लक्षात ठेवा.







