Empty Stomach Foods : सकाळी रिकाम्या पोटी काय खावं आणि काय टाळावं?
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी नेमकं काय खावं आणि काय टाळावं? काही जण डोळे उघडताच चहा-कॉफी पितात, तर काही जण फळं किंवा ड्रायफ्रुट्स खाण्याला पसंती देतात. रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाणं फायद्याचं ठरतं आणि कोणत्या पदार्थांपासून लांब राहायला हवं.

सकाळी रिकाम्या पोटी काय खावं?
आपण सकाळी जो नाश्ता करतो, त्यावर आपला संपूर्ण दिवस कसा जाईल हे अवलंबून असतं. म्हणूनच सकाळी उठल्यावर पोटाला त्रास न देणारे आणि शरीराला पोषण देणारे पदार्थ आपण खायला हवेत. तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी काही पदार्थ खाणं खूप फायदेशीर ठरतं, तर काही पदार्थ कटाक्षाने टाळायला हवेत. चला तर मग, सकाळी रिकाम्या पोटी काय खावं आणि काय टाळावं हे समजून घेऊया.

पाणी पिण्याची सवय
सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी एक ग्लास पाणी पिणं ही खूप चांगली सवय आहे. रात्रभर आपण पाणी पीत नाही, त्यामुळे सकाळी शरीराला पाण्याची गरज असते. झोपेतून उठल्यावर पाणी प्या आणि थोड्या वेळानंतर नाश्ता करा. तुम्ही सफरचंद, केळी, पपई, संत्री किंवा पेरू यांसारखी फळं सकाळी खाऊ शकता. या फळांमधून शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं आणि फायबर मिळतं. फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणं जास्त फायदेशीर ठरतं.
ओट्स, ड्रायफ्रुट्स आणि अंडी
तुम्ही सकाळी भिजवलेले बदाम आणि अक्रोड यांसारखे ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. हे पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजेत. ओट्समध्ये फळं आणि ड्रायफ्रुट्स मिसळून खाणं हा एक उत्तम नाश्ता आहे. अंडीसुद्धा सकाळच्या नाश्त्यासाठी चांगला पर्याय आहेत. तुम्ही उकडलेलं अंडं किंवा कमी तेलात बनवलेलं ऑम्लेट खाऊ शकता. अंड्यासोबत भाज्या किंवा चपाती खाल्ल्यास शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.
इडली आणि डोसा
तुम्ही इडली, डोसा, उपमा किंवा पोंगल यांसारखे नेहमीचे पदार्थ नाश्त्याला खाऊ शकता. या पदार्थांसोबत डाळ, सांबार, भाज्या किंवा चटणी खाल्ल्यास तुमचा नाश्ता अधिक संतुलित होतो. रोज तोच तोच नाश्ता करण्यापेक्षा वेगवेगळ्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा.
रिकाम्या पोटी हे पदार्थ टाळा
सकाळी खूप तिखट किंवा जास्त तेलकट पदार्थ खाणं टाळा. भजी, पकोडे, वडे किंवा पुरी यांसारखे पदार्थ रोज खाण्याऐवजी कधीतरी खा. हे पदार्थ जास्त खाल्ल्यास काहींना पोट जड झाल्यासारखं वाटू शकतं. तसेच सकाळी गोड पदार्थ जास्त खाऊ नका. मिठाई, बिस्किटं, पॅकबंद ज्यूस आणि जास्त साखर असलेली पेयं रोज पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही. त्याऐवजी फळं किंवा कमी साखर असलेले पदार्थ निवडा.
चहा-कॉफीपासून लांब राहा
अनेकांना सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण रिकाम्या पोटी चहा-कॉफी प्यायल्याने काहींना छातीत जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. तुम्हाला असा त्रास होत असेल, तर आधी थोडा नाश्ता करा आणि त्यानंतरच चहा किंवा कॉफी प्या.
सकाळचा नाश्ता टाळणं अजिबात योग्य नाही. जे लोक सकाळी लवकर कामाला लागतात किंवा जास्त शारीरिक कष्ट करतात, त्यांनी पुरेसा आहार घ्यायला हवा. नाश्ता कमी केल्यास थोड्याच वेळात पुन्हा भूक लागू शकते. त्यामुळे फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर शरीराला पोषण मिळण्यासाठी नाश्ता करा.
