ब्ल्यूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. रोजच्या आहारात याचा समावेश केल्यास हृदय निरोगी राहतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचनक्रियाही सुधारते.

मुंबई : ब्ल्यूबेरी हे निळ्या-जांभळ्या रंगाचं एक अतिशय चविष्ट फळ आहे. या छोट्याशा फळात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँथोसायनिनसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स ठासून भरलेले असतात. रोज ब्ल्यूबेरी खाल्ल्याने शरीराला अनेक जबरदस्त फायदे होतात. चला तर मग, हे फायदे कोणते ते जाणून घेऊया.

१. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

ब्ल्यूबेरीमधील अँटीऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम हृदयाला निरोगी ठेवण्याचं काम करतात. यातील अँथोसायनिनमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि रक्तवाहिन्यांचं काम सुरळीत चालतं. शिवाय, हे फळ शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतं, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका टळतो.

२. मेंदूसाठी उत्तम

ब्ल्यूबेरी खाल्ल्याने मेंदूचं आरोग्य सुधारतं आणि स्मरणशक्ती वाढते. यातील अँटीऑक्सिडंट्स मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज कमी करतात. यामुळे मेंदूचं वय वाढण्याची प्रक्रिया मंदावते आणि तुमची शिकण्याची क्षमता तसेच स्मरणशक्ती अधिक तीक्ष्ण होते.

३. रक्तातील साखर नियंत्रणात राहते

ब्ल्यूबेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो आणि त्यात फायबर भरपूर असतं. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ खूप उपयुक्त ठरतं. यातील अँथोसायनिनसारखे घटक इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आणि ग्लुकोज मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतात.

४. पचनक्रिया सुधारते

ब्ल्यूबेरीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही आणि पचनक्रिया सुधारते. याशिवाय, यात प्रीबायोटिक्स असतात, जे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतात आणि आतड्यांचं आरोग्य उत्तम राखतात.

५. रोगप्रतिकारक शक्ती वाढते

ब्ल्यूबेरीमध्ये व्हिटॅमिन सी सह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. व्हिटॅमिन सी एक उत्तम अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. हे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती आणि कार्यक्षमता वाढवतं, ज्यामुळे संसर्गाशी लढण्याची शरीराची ताकद वाढते.

६. कर्करोगापासून बचाव

ब्ल्यूबेरीमधील अँटीऑक्सिडंट्स, विशेषतः अँथोसायनिन, कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी मदत करतात. या फळामध्ये असे अनेक घटक आहेत जे कर्करोगाशी लढण्यासाठी शरीराला बळ देतात.