Breast Cancer Risk : ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं दिसण्याआधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर त्याचा धोका कमी करता येतो. यासाठी आपल्या जीवनशैलीत काही सोपे बदल करणं गरजेचं आहे. जाणून घेऊया या महत्त्वाच्या ५ गोष्टी.
मुंबई : आपल्याला काही त्रास व्हायला लागला किंवा शरीरात गाठ वगैरे जाणवली की मगच आपण डॉक्टरकडे धाव घेतो. पण ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजारांमध्ये, लक्षणं दिसण्याआधीच काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. जीवनशैलीत बदल करून कॅन्सर पूर्णपणे टाळता येईलच असं नाही, पण त्याचा धोका नक्कीच कमी करता येतो. चला तर मग, जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत.
नियमित व्यायाम करा
रोज व्यायाम केल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं आणि हार्मोन्सचं संतुलनही बिघडत नाही. यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी व्हायला मदत होते. यासाठी खूप अवघड व्यायाम करायची गरज नाही. आठवड्यातून किमान ५ दिवस, रोज ३० मिनिटं भरभर चालणं, पोहणं, सायकल चालवणं किंवा डान्स करणंही फायद्याचं ठरतं.
सकस आणि संतुलित आहार घ्या
ब्रेस्ट कॅन्सरला दूर ठेवेल असा कोणताही एक 'जादूई' पदार्थ नाही. त्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. आपल्या रोजच्या जेवणात ताज्या भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, कडधान्यं, सुकामेवा आणि बिया यांचा समावेश करा. रेड मीट, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त साखर असलेले पदार्थ खाणं टाळा.
दारू पूर्णपणे टाळा
दारू पिणं आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका यांच्यात थेट संबंध आहे. अगदी थोड्या प्रमाणात दारू पिणंही सुरक्षित नाही, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर दारू पूर्णपणे बंद करणं हाच सर्वोत्तम उपाय आहे.
स्वतःच स्तनांची तपासणी करा
प्रत्येक महिलेने दर महिन्याला स्वतःच्या स्तनांची तपासणी (Self-Breast Examination) करण्याची सवय लावली पाहिजे. यामुळे शरीरात होणारे बदल लगेच लक्षात येतात. स्तनांमध्ये नवीन गाठ, त्वचेवर सुरकुत्या, Nipples मधून काही द्रव येणं, ते आत ओढली जाणं किंवा स्तनाच्या आकारात अचानक बदल दिसल्यास लगेच डॉक्टरांना भेटा.
डॉक्टरांकडून तपासणी आणि स्क्रिनिंग
चांगली जीवनशैली आहे म्हणजे आजाराचा धोका नाही, असं म्हणून चालणार नाही. त्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी खूप गरजेची आहे. तिशीनंतर डॉक्टरांकडून नियमित तपासणी सुरू करता येते. लक्षणं दिसण्याआधीच कॅन्सर ओळखण्यासाठी स्क्रिनिंग टेस्ट्स खूप मदत करतात. तुमच्या कुटुंबात कुणाला कॅन्सरचा इतिहास आहे का आणि तुमची प्रकृती कशी आहे, यावर डॉक्टर तुम्हाला कधी आणि किती वेळाने तपासणी करायची हे सांगतील.


