डिलिव्हरी बॉयच्या निरागस प्रतिक्रियांनी इंटरनेटवर सर्वांची मनं जिंकली आहेत. या महिलेने गिफ्ट दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर लगेच हसू आलं आणि त्यांनी तिचे आभार मानले. हा व्हिडिओ पाहून तुमचाही दिवस नक्कीच खास होईल.
मुंबई : इंटरनेटवर असाच एक सुंदर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही डोळ्यांत नक्कीच पाणी येईल. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. भारतात दिवाळी सण खूप उत्साहात साजरा केला जातो. पण या सकारात्मकतेसोबतच काही लोकांच्या मनात जुन्या आठवणी, दुःख किंवा पैशांची कमतरता या गोष्टीही असतात. जेव्हा आपण सर्वजण आरामात सण साजरा करत असतो, तेव्हा काही लोक रात्रंदिवस काम करत असतात. जसे की आपले डिलिव्हरी बॉईज!
सर्वांसाठी काहीतरी खास -
इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या एका नवीन व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला वेगवेगळ्या ई-कॉमर्स अॅप्सवरून दिवाळीचे खूप सारे गिफ्ट्स ऑर्डर करताना दिसत आहे. पण तिने हे गिफ्ट्स स्वतःसाठी न ठेवता डिलिव्हरी बॉयला देऊन त्यांना मोठा सरप्राईज दिला. डिलिव्हरी एजंट्सच्या निरागस प्रतिक्रियांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. हे गिफ्ट पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि त्यांनी महिलेचे आभार मानले, ज्यामुळे सर्वांचाच दिवस खास झाला.
व्हायरल व्हिडिओ
या इन्स्टाग्राम युजरने शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ दशलक्षांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “दिवाळी म्हणजे फक्त आपल्या जवळच्या लोकांसोबत सण साजरा करणं नाही; तर ज्यांच्यामुळे आपलं रोजचं आयुष्य सोपं होतं, त्यांच्यात आनंद वाटणं हेसुद्धा आहे. एक छोटंसं सरप्राईज, एक छोटीशी कृती आणि एक मोठं हसू!”
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया!
एका युजरने लिहिलंय, "त्यांचा तर दिवसच बनला."
दुसऱ्या एकाने कमेंट केली, "खूपच हृदयस्पर्शी." तर आणखी एकाने त्यांच्या "स्माईल"चं कौतुक केलं आहे.
व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या या महिलेने नंतर लिहिलं, “तुम्ही दिलेल्या या भरघोस प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्याकडे शब्द नाहीत, पण तुम्ही हे सिद्ध केलंय की चांगुलपणा अनमोल असतो. संधी मिळाल्यास समाजाला नक्की काहीतरी परत द्या, निसर्ग तुम्हाला त्याहून अधिक पटीने परत करेल.”














