एका ३-स्टार हॉटेलमध्ये जेवणाचे बिल दिल्यानंतर उरलेले पैसे वेटरने ग्राहकाला न विचारताच टिप म्हणून स्वतःकडे ठेवले. या घटनेनंतर सोशल मीडियावर टिपिंग संस्कृतीवरून मोठी चर्चा सुरू झाली आहे.
हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर टिप देण्यावरून सध्या सोशल मीडियावर एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका ग्राहकाने आरोप केलाय की, वेटरने त्याला न विचारताच उरलेले पैसे टिप म्हणून स्वतःकडे ठेवले. ही घटना तेव्हा घडली जेव्हा काही मित्र एका ३-स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यांच्या जेवणाचे बिल ९२० रुपये आले. ग्राहकाने वेटरला १००० रुपयांची नोट दिली आणि उरलेले ८० रुपये परत मिळतील अशी त्याची अपेक्षा होती.
पण तसं न होता, वेटरने ते उरलेले पैसे ग्राहकाला परत न करता टिप म्हणून स्वतःकडेच ठेवले.
वेटरच्या या वागण्यामुळे ग्राहकाला धक्काच बसला. यानंतर ग्राहक, वेटर आणि हॉटेल मॅनेजर यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.
या ग्राहकाने एक्स (X) वर एक पोस्ट शेअर करत आपला अनुभव सांगितला. "आज मित्रांसोबत एका ३-स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. बिल ९२० रुपये आलं, म्हणून मी वेटरला १००० रुपये दिले. त्याने हसून मला 'थँक्यू सो मच सर' असं म्हटलं," असं या युजरने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
जेव्हा ग्राहकाने उरलेल्या पैशांबद्दल विचारलं, तेव्हा वेटरने अगदी सहजपणे सांगितलं की ती रक्कम 'वेटरची टिप' म्हणून वळती करण्यात आली आहे.
"मला खरंच वाटलं की तो मस्करी करतोय. पण जेव्हा मी त्याला विचारलं की माझ्या परवानगीशिवाय तू असं कसं करू शकतोस, तेव्हा तो आणि मॅनेजर माझ्याशी हुज्जत घालू लागले. 'ग्राहकांनी सर्व्हिससाठी टिप देणं अपेक्षित असतं,' असं त्यांचं म्हणणं होतं," असं ग्राहकाने सांगितलं.
हॉटेल प्रशासनाच्या या उत्तरामुळे ग्राहकाला प्रश्न पडलाय की, हॉटेलमध्ये टिप देणं ही आता ऐच्छिक गोष्ट राहिली आहे की ती सक्तीची केली जात आहे?
"एक मिनिट, ग्राहकांकडून जबरदस्तीने टिप घेणं कधीपासून सुरू झालं? ही तर ऐच्छिक गोष्ट असायला हवी ना?" असा सवाल त्याने उपस्थित केला.
भारतात टिप देण्याबाबत वाढत चाललेल्या या सक्तीवर ग्राहकाने तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्व्हिस आवडल्यास टिप द्यायची की नाही, हा सर्वस्वी ग्राहकाचा अधिकार असायला हवा, असं त्याचं म्हणणं आहे.
"जर मला सर्व्हिस आवडली आणि मला त्याचं कौतुक करायचं असेल, तर मी टिप देईन. जर मला द्यायची नसेल, तर तो माझा निर्णय असायला हवा. शेवटी तो माझा पैसा आहे, तो कुठे आणि कसा खर्च करायचा हे मीच ठरवणार," असंही त्याने ठणकावून सांगितलं.
'टिप देणं सक्तीचं करू शकत नाहीत'
सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी या ग्राहकाची बाजू घेतली आहे. टिप ही ग्राहकाने स्वतःच्या इच्छेने दिली पाहिजे, हॉटेल कर्मचाऱ्यांनी ती गृहीत धरू नये, असं अनेकांनी म्हटलं आहे.
एका युजरने लिहिलं, "हॉटेलवाले टिपसाठी विनंती करू शकतात, पण ते सक्तीचं करू शकत नाहीत. आणि ग्राहकाने नकार दिल्यास ते हुज्जतही घालू शकत नाहीत." तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं, "हे लोक अमेरिकन टिपिंग संस्कृती इथे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार ते ग्राहकांच्या माथी मारत आहेत."
