जंक फूड खाण्यापासून लेकीला रोखण्यासाठी एका बापाने चक्क खोटा अल्ट्रासाऊंड केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लॅपटॉपवर पोटातील जंत दाखवून त्याने मुलीला इतकं घाबरवलं की ती रडत रडत जंक फूड न खाण्याचं प्रॉमिस देते. या ट्रिकमुळे काम तर झालं, पण इंटरनेटवर मात्र यावरून दोन गट पडले आहेत.
मुंबई : लहान मुलांना जंक फूडपासून दूर ठेवणं हे पालकांसाठी मोठं आव्हान असतं. पण एका बापाने आपल्या लेकीला जंक फूड खाण्यापासून रोखण्यासाठी जी भन्नाट शक्कल लढवली, त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये हा माणूस लॅपटॉपला जोडलेला कॉम्प्युटर माऊस स्कॅनिंग मशीनसारखा वापरून मुलीचा खोटा अल्ट्रासाऊंड करताना दिसतोय. लॅपटॉपच्या स्क्रीनवर तिच्या पोटात जंत वळवळताना दिसत आहेत.
अर्चना सिंग यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तो वेगाने व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये, वडील मुलीच्या पोटावर माऊस फिरवतात आणि तिला लॅपटॉपवरचे ते भयानक फोटो दाखवतात. ते पाहून ही चिमुकली चांगलीच घाबरते आणि रडत रडत थेट आईला जाऊन मिठी मारते.
बापाची ही ट्रिक तात्पुरती का होईना, पण कामी आली. कारण त्या मुलीने यापुढे जंक फूड न खाण्याचं प्रॉमिस दिलं. या पोस्टला कॅप्शन दिलंय, "बापाच्या एका खोट्या अल्ट्रासाऊंडने मुलीची जंक फूड खाण्याची सवय एका झटक्यात मोडली."
हा व्हायरल व्हिडिओ इथे पाहा:
मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी त्यांना असं घाबरवणं कितपत योग्य आहे, यावरून नेटकऱ्यांमध्ये मात्र दोन गट पडले आहेत. एका युजरने कमेंट केली की, "या मुलीला वकिलाची गरज आहे." तर दुसऱ्या एकाने या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिलं, "जेव्हा मुलं खोटं बोलतात आणि इतरांची फसवणूक करतात, तेव्हा आपण आश्चर्य व्यक्त करतो. पण ते हे सगळं कुठून शिकतात याचा विचार करा."
आणखी एका युजरने तटस्थ प्रतिक्रिया देत म्हटलंय, "मुलांना शिकवण्याची ही पण एक पद्धत असू शकते." पण बऱ्याच जणांनी अशी भीती व्यक्त केलीय की, या प्रँकमुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो.
जंक फूडच्या दुष्परिणामांबद्दल मुलांना घाबरवण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधी सप्टेंबरमध्ये एक्स (X) युजर नीतू खंडेलवाल यांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात एक शिक्षिका मुलांना चिप्स, बिस्किटे आणि चॉकलेट्स खाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या पोटात कसे 'जंत' होतात, याचं प्रात्यक्षिक दाखवताना दिसली होती.
या दोन्ही व्हायरल घटनांनंतर, मोठ्या माणसांनी मुलांना अनहेल्दी फूडचे तोटे कसे समजावून सांगावेत, यावर इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. बापाच्या या प्रँकमुळे मुलीने जंक फूड खाणं सोडलं असलं तरी, मुलांना अन्नाबद्दल आणि आरोग्याबद्दल शिकवताना अशा भीती दाखवणाऱ्या पद्धती वापरणं योग्य आहे का, यावर लोकांची मतं अजूनही विभागलेलीच आहेत.


