फराह नावाची तरुणी १५ दिवसांच्या मुंबई दौऱ्यानंतर पुन्हा दुबईला परतली आहे. तिने मुंबईतील ट्रॅफिक, वाढता खर्च आणि दुबईतील शांत जीवन यांची तुलना केली आहे. मुंबईची आठवण येत असली तरी दुबईतील आयुष्य अधिक सोयीस्कर असल्याचं तिने म्हटलं आहे.

मुंबई : फराह नावाची एक तरुणी १५ दिवस मुंबईत राहून नुकतीच दुबईला परतली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत मुंबई आणि दुबईतील जीवनशैलीची तुलना केली आहे. भारतात परतल्यावर तिला फार मोठा 'कल्चर शॉक' बसला नाही, पण काही गोष्टी मात्र प्रकर्षाने जाणवल्याचं ती सांगते. तिचे हे निरीक्षण सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

अनेक गोष्टी सारख्याच, पण...

मुंबई आणि दुबई या दोन्ही शहरांमध्ये उंच इमारती, मेट्रो आणि धावपळीचं जीवन आहे. त्यामुळे वरवर पाहता दोन्ही शहरं सारखीच वाटू शकतात. पण, १५ दिवसांच्या या ट्रिपमध्ये फराहला सर्वात मोठा फरक जाणवला तो ट्रॅफिकचा. दुबईत गाड्या अतिशय शिस्तीत धावतात आणि लोक संयमाने वाट पाहतात. याउलट, मुंबईत एकाच सिग्नलवर गाड्यांच्या रांगा लागतात आणि ड्रायव्हर्स सतत हॉर्न वाजवून वैताग आणतात. दुबईत शांतता असते, तर मुंबईत ट्रॅफिकमध्ये हॉर्नचा आवाज एखाद्या 'बॅकग्राउंड म्युझिक'सारखा वाटतो, असं फराहने गमतीने म्हटलं आहे.

View post on Instagram
 

मुंबईची आठवण येते, पण दुबईच बरी

ट्रॅफिकपेक्षाही फराहला सर्वात मोठा धक्का बसला तो मुंबईतील वाढत्या महागाईचा. मुंबई आता पूर्वीसारखं स्वस्त शहर राहिलेलं नाही, असं ती स्पष्टपणे सांगते. मुंबईत ती स्वतःचं घर भाड्याने घेत नसल्याने घरभाड्यावर तिने भाष्य करणं टाळलं.

पण, बाहेर जेवायला जाणं किंवा इतर छोट्या-मोठ्या गोष्टींवर सहज ५,००० ते ६,००० रुपये खर्च होतात, याकडे तिने लक्ष वेधलं. मुंबईत ज्या वेगाने महागाई वाढतेय, त्या वेगाने पगार मात्र वाढत नाहीत, असं फराहचं म्हणणं आहे. त्यामुळे ज्यांना दुबईत चांगल्या पगाराचं पॅकेज मिळत आहे, त्यांनी तिथेच राहण्याचा विचार करावा, असा सल्लाही तिने दिला. मुंबईची नक्कीच आठवण येते, पण दुबईत हॉर्नचा कमी आवाज, खड्डे नसलेले रस्ते आणि आर्थिक स्थैर्य मिळत असल्याने तिथे परतल्याचा कोणताही पश्चात्ताप नसल्याचं तिने शेवटी स्पष्ट केलं.