एका कुटुंबाच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले.
एका कुटुंबाच्या हवनादरम्यान अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याने भयंकर गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळत असताना, एक महिला मात्र पवित्र अग्नीसमोर शांतपणे बसून प्रार्थना करत राहिली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोक थक्क झाले आहेत.
व्हिडिओमध्ये कुटुंब मोकळ्या अंगणात चटईवर बसून हवन करताना दिसत आहे. सर्व काही शांततेत सुरू असताना हवनाच्या कुंडातून निघणाऱ्या धुरामुळे जवळच्या पोळ्यातील मधमाश्या बिथरल्या आणि त्यांनी सर्वांवर हल्ला केला.
मधमाश्यांनी कुटुंबाला घेरल्यावर एकच गोंधळ उडाला. लोक स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. एका महिलेने साडीच्या पदराने स्वतःला झाकून घेतले आणि पळ काढला, तर एक माणूस मधमाश्यांपासून वाचण्यासाठी जमिनीवर झोपला.
हवन करणारे भटजीदेखील सुरक्षिततेसाठी उठून पळाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मधमाश्यांचा हल्ला होऊनही महिला हवनासमोरून उठली नाही
या गोंधळात, हवन कुंडासमोर बसलेली एक महिला मात्र अजिबात हलली नाही. इतर लोक पळत असताना मधमाश्या तिच्याभोवती फिरत होत्या, तरीही ती जागेवरच होती.
आजूबाजूला एवढा गोंधळ सुरू असूनही ती महिला शांतपणे मंत्रोच्चार आणि प्रार्थना करत राहिली.












